Home ठळक बातम्या पनवेल पंचायत समिती सभापतीपदी रंजना वास्कर तर उपसभापतीपदी भूपेंद्र पाटील

पनवेल : पनवेल तालुका पंचायत समितीच्या राजकारणात ऐतिहासिक बदल घडला असून पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे कमळ या समितीवर फुलले आहे. भाजपच्या वतीने करंजाडे गणातून निवडून आलेल्या रंजना सदाशिव वास्कर सभापतीपदी तर आकुर्ली गणातून निवडून आलेले भूपेंद्र सदानंद पाटील हे उपसभापती विराजमान झाले आहेत. अनेक दशकांपासून पंचायत समितीवर असलेला शेतकरी कामगार पक्षाचा एकछत्री अंमल आता संपुष्टात आली आहे.
या निवडीनंतर घोषणा, ढोलताशा आणि फटाक्यांच्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. विजय अद्भुतपूर्व असला तरी या विजयी जल्लोषात विनम्रपणा स्पष्टपणे जाणवत होता. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, महापौर नितिन पाटील, माजी सभागृहनेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, युवा नेते प्रितम म्हात्रे यांच्यासह इतर नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सभापती, उपसभापती यांचे अभिनंदन केले. त्यानंतर मार्केट यार्ड येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे भाजपने करंजाडे गणातून विजयी झालेल्या रंजना वास्कर यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्या भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या कन्या असून अरुणशेठ भगत यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा बाळकडू त्यांना मिळाला आहे. त्याचबरोबरीने त्यांचे पती सदाशिव वास्कर यांनी कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची छापसुद्धा त्यांच्यावर आहे. उपसभापतीपदी निवड झालेले युवा नेते भूपेंद्र पाटील यांनी मागील टर्ममध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून सक्षम व प्रभावी काम केले आहे. जनसंपर्काची उत्तम जाण आणि युवा संघटनाची मजबूत पकड ही त्यांच्या कार्याची जमेची बाजू मानली जाते.
पंचायत समितीमध्ये सत्ता यावी हि अनेक वर्षांची ईच्छा होती, ती पूर्ण झाली. या अनुषंगाने नागरिकांचे काम जलदगतीने आणि योग्यप्रकारे होणार आहेत. या विजयात प्रत्येक कार्यकर्त्याचा सहभाग आहे. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
– लोकनेते रामशेठ ठाकूर
गेली २० वर्षे अरुणशेठ भगत तळमळीने काम करत आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखात धावणारे ते नेते आहेत. त्यामुळे या विजयात त्यांचा मोठा वाटा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण कार्यकर्त्याच्या पाठीशी कायम उभे राहिले आहेत. एवढा मोठा आपण विजय मिळवला असला तरी आपण विनम्र आहोत. १६ पैकी १५ जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले असले तरी पुढच्या वेळी १०० टक्के जागा जिंकायच्या आहेत. महायुतीमधील घटक पक्ष आणि कार्यकर्ते, मतदार, नागरिकांचे आभार – आमदार प्रशांत ठाकूर