रायगड जिल्हा परिषदेत ऐतिहासिक बदल; प्रथमच भाजपचा अध्यक्ष विराजमान

0
24

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मंगेश रामचंद्र वाकडीकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर मारूती पाटील

नवीन पनवेल : रायगड जिल्हा परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक यश मिळवत जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण निर्माण केले आहे. पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या ८ पैकी ८ जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले असून या विजयामुळे रायगड जिल्हा परिषदेत प्रथमच भारतीय जनता पक्ष निर्णायक भूमिकेत आला आहे. परिणामी जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष विराजमान झाला असून जिल्ह्याच्या राजकारणात हा मोठा आणि ऐतिहासिक बदल मानला जात आहे. या बदलामुळे भविष्यात रायगड जिल्हा परिषदेत भाजपची राजकीय समीकरणे अधिक मजबूत होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.
याचबरोबर पनवेल पंचायत समितीमध्येही भाजपने प्रथमच सत्ता मिळवली आहे. पनवेल पंचायत समितीच्या १६ पैकी १५ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवत स्पष्ट वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने एकहाती विजय मिळवत शहरातील राजकारणात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या विजयाची सुरुवात भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या प्रभाव असलेल्या प्रभागातून झाली, जिथे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले. त्यानंतर पनवेल शहर परिसरातून आणखी चार नगरसेवक बिनविरोध निवडून येत भाजपच्या संघटनात्मक ताकदीची प्रचिती दिली.
ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी सन २०२५ मध्ये अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच तसेच हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेशानंतर पनवेल तालुक्यात भाजपच्या संघटनात्मक बळात मोठी वाढ झाली. विशेष म्हणजे प्रितम म्हात्रे यांच्या प्रवेशानंतर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात भाजपाला पडलेल्या मतांमध्ये विधानसभा २०२४ च्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषद २०२६ मध्ये ३०,००० पेक्षा अधिक मतांची वाढ झाली. त्यामुळे संघटनात्मक बळ अधिक मजबूत होऊन या निवडणुकीत हा विजय शक्य झाला.
भाजपचे आमदार असताना जिल्हा परिषद गण गव्हाण, वडघर, केळवणे, वावंजे, वावेघर, पळस्पे आदी पारंपरिक विभाग हे शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यातच होते. प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशानंतर गावोगावी जाऊन भाजपची विचारधारा, केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती तसेच तरुणांसाठी रोजगार निर्मितीचे नियोजन प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आले. परिणामी पारंपरिक मतदारांमध्ये सकारात्मक मतपरिवर्तन होऊन भाजपच्या उमेदवारांना स्पष्ट जनादेश मिळाला.

याबाबत प्रतिक्रिया देताना भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते रामशेठ ठाकूर आणि ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या योग्य सहकार्यामुळे हा ऐतिहासिक विजय आम्हाला मिळवता आला. एकत्रित संघटन कौशल्यामुळे भाजपची विचारधारा आम्ही शेकापच्या पारंपारिक मतदारांना पटवून त्यांचे मतपरिवर्तन करू शकतो. कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि जनतेच्या विश्वासामुळे भारतीय जनता पक्षाला हे यश मिळाले. भविष्यातही यापेक्षा मोठा विजय मिळवत विकासाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष अधिक बळकट होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”