Home ठळक बातम्या पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांची विधानसभेत आग्रही भूमिका

पनवेलच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावर बोलताना आग्रही भूमिका मांडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, विमानतळाचे नामकरण, नैना, सिडको, वीज, गरजेपोटी घरे, पाणी पुरवठा, पनवेल बस स्थानक, वीज, पायाभूत सुविधा अशा विविध विषयांचा उहापोह त्यांनी करत या सर्व विषयांवर शासनाचे लक्ष केंद्रित केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा एकमेळ नाही तर विकसित महाराष्ट्राचे लक्ष्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात बोलताना म्हंटले कि, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ या विश्वासाकडे नेणारा आश्वासित महामार्गाचे हे एका अर्थाने जाळं आहे. प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन हे राज्याला १ ट्रिलियन डॉलर नेण्यासाठी अत्यंत महत्वाचे निर्णायक ठरणार आहेत. यावेळी बोलताना त्यांनी नवी मुंबई विमानतळाचे महत्व नमूद केले. यामुळे पनवेल,नवी मुंबई, एमएमआरडीए या क्षेत्राला एका अर्थाने ग्लोबल बनवणार आहे. २५ डिसेंबर २०२५ पासून विमानतळ कार्यान्वित झाले यामुळे पनवेल आणि परिसराला उर्जितावस्था येणार असल्याचे म्हंटले. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केली गेली आहे. ती सुद्धा आता लवकरात लवकर मान्यता केंद्र सरकारकडून मिळवण्यासाठी माननिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न झाले पाहिजेत अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात करत या विषयावर सरकारचे लक्ष वेधले.
विकासाच्या दृष्टिकोनातून बोलताना, विमानतळ मेट्रो ८ च्या माध्यमातून मुंबई विमानतळाला जोडले जाणार आहे. मेट्रो २ नवी मुंबई तळोजा खांदेश्वर म्हणजेच पनवेल ते तळोजा जोडला जाणार आहे. उलवे आणि खारघर सागरी मार्ग तसेच तुर्भे- खारघर या मार्गानेही विमानतळ आणि परिसर जोडला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैनाच्या बरोबरीने तिसरी मुंबईची उभारणी करण्याची घोषणा केली आहे. आणि त्यामुळे हे परिसर डेव्हलपमेंट सेंटर च्या माध्यमातून उभे राहणार आहे. यालाच जोडून रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे या परिसरात उभे राहत आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्ग होत असताना पनवेल वसई कॉरिडोर प्रस्तावित केला गेला आहे. याचबरोबरीने या परिसराला मोठे ट्रान्सफर हब विकसित केला जाणार आहे. विमानतळाच्या दृष्टिकोनातून नवीन शहरे केंद्र सुद्धा विकसित होणार आहेत. कि ज्याच्यामध्ये एज्युसिटी, स्पोर्ट्ससिटी, इनोव्हेशन सिटी उभी राहणार आहेत. एकूण विकसित महाराष्ट्र २०४७ महाराष्ट्राचे ग्रोथ हब या क्षेत्रात उभे राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल बस स्थानकाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला. बीओटी धर्तीवर बसस्थानक विकसित करण्याचे ठरले पण त्यात अनेक अडथळे आले. आमदार प्रशांत ठाकूर यांचा दीर्घकाळापासून पुनर्विकासासाठी पाठपुरावा सुरु आहे. परिवहन मंत्र्याकडेही कायम पाठपुरावा राहिला आहे. त्यामुळे या स्थानकाच्या कामाला लवकरात लवकर सुरु होण्याची आवश्यकता आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात अधोरेखित केली.