Home ठळक बातम्या दिव्यांगाना आपण फक्त साथ दिली तरी त्यांचे जीवन सफल होईल – नमिता...

कर्जत : ‘परमेश्वराने आपल्याला सारे काही दिले आहे. मात्र दिव्यांगांना प्रचंड इच्छा शक्ती दिली आहे. त्यांना आपल्या साथीची आवश्यकता आहे. ती साथ आपण दिली तरी त्यांचे जीवन सफल होईल. मैत्रीबोध परिवाराने अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून आपण सहकार्य करीत आहोत. या शिबिराचा लाभ अगदी शेवटच्या दिव्यांग बांधव – भगिनीपर्यंत मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू या.’ असे महत्वपूर्ण प्रतिपादन कर्जत पांच्यात समितीच्या सभापती नमिता घारे यांनी येथे केले.
मैत्रीबोध परिवार आणि पंचायत समिती कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने जयपूर फूट शिबिराचे आयोजन येथील रॉयल गार्डनच्या सभागृहात करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या शिबिराचे उदघाट्न सभापती नमिता घारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उदघाट्न करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष पुष्पा दगडे, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, श्री श्री मित्र जीवजी, पंचायत समिती सदस्य महेश खारीक, अक्षय तिटकरे, नमिता श्रीखंडे, कविता पादीर, गट विकास अधिकारी सुशांत पाटील, गट शिक्षण अधिकारी अनंत खैरे, नगरसेवक महेंद्र चंदन, अशोक राऊत आदी उपस्थित होते.
मैत्रीबोध परिवाराच्या विनय मुंडदा आणि डॉ. विनीत अग्रवाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अनुराधा गोखले यांनी प्रस्ताविकात ‘आपण जी सेवा कराल ती जगात सर्वांना कायम उपयोगी होईल. अशी करा. साडे तीनशेहून अधिक लाभार्थी या पाच दिवसीय शिबिरात लाभ घेणार आहेत. आता तुमच्या साठी आवश्यक असलेल्या अवयवाचे माप घेऊन लगेचच तो अवयव तयार करून तुम्हाला घरी जाताना देण्यात येईल.’ असे स्पष्ट केले.
विलास श्रीखंडे यांनी ‘मैत्रीबोध परिवार गेल्या बारा – तेरा वर्षांपासून कार्यरत आहे. ते तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय कार्य करीत आहेत. ही कर्जतकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.’ असे सांगितले. संतोष पाटील यांनी, ‘कर्जत मधील दिव्यांगांना तुमच्या हाताने मदत होते. त्याचा आम्हाला समाधान आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आपल्याला नेहमीच दिसावे. यासाठी आम्हीही सहकार्य करू.’ असे आश्वासन दिले. सूत्रसंचालन अनुराधा गोखले यांनी केले. याप्रसंगी डॉ. कुंती नागवेकर, राहुल मेहता, जनार्दन पानमंद, किशोर आणेकर, प्रशांत जगताप, केतन बेलोसे, रवींद्र घारे आदींसह दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.