Home ठळक बातम्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडच्या महिला खेळाडूंची सुवर्णभरारी!
रायगड : छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथे २४ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित फेडरेशन कप आणि वेस्ट झोन पॉवरलिफ्टिंग क्लासिक व इक्विप्ड स्पर्धा २०२६ मध्ये रायगडच्या महिला खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत गायत्री महेश बडेकर हिने दोन नवीन राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली, तर अमृता भगत हिने सुवर्णपदकांसह मानाचे किताब पटकावले.
आयएनडी क्लब, कर्जतची खेळाडू गायत्री महेश बडेकर हिने फेडरेशन कप इक्विप्ड स्पर्धेच्या ४७ किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी केली. तिने स्क्वॅट प्रकारात १६० किलो, बेंच प्रेसमध्ये ७५ किलो आणि डेडलिफ्टमध्ये १५२.५ किलो असे एकूण ३८७.५ किलो वजन उचलले. विशेष म्हणजे, स्क्वॅट आणि डेडलिफ्ट या दोन्ही प्रकारांत तिने नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. गायत्रीला राष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग व कुस्तीपटू हनुमंत माधव खरात यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
दरम्यान, फेडरेशन कप क्लासिक स्पर्धेत ४७ किलो वजनी गटात अमृता भगत हिनेही दमदार कामगिरी केली. तिने स्क्वॅटमध्ये १२० किलो, बेंच प्रेसमध्ये ६० किलो आणि डेडलिफ्टमध्ये १४७.५ किलो असे एकूण ३२७.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. यासोबतच तिने ४७ किलो वजनी गटातील ‘स्ट्राँग वुमन फेडरेशन कप’ हा किताबही आपल्या नावे केला.
अमृता भगत हिने वेस्ट झोन स्पर्धेतही आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. या स्पर्धेत तिने स्क्वॅटमध्ये १२२.५ किलो, बेंच प्रेसमध्ये ६२.५ किलो आणि डेडलिफ्टमध्ये १५० किलो असे एकूण ३३५ किलो वजन उचलत सुवर्णपदकाची कमाई केली. याशिवाय ४७ किलो वजनी गटातील ‘बेस्ट लिफ्टर’ किताबही तिने पटकावला. अमृताला तिचे पती विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
रायगडच्या महिला खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशाबद्दल राज्य संघटनेचे सचिव तथा शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित संजय सरदेसाई यांनी अभिनंदन केले. तसेच पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक, सचिव अरुण पाटकर, सहसचिव सचिन भालेराव, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, खजिनदार राहुल गजरमल, सदस्य संदीप कृष्णा पाटकर, सुभाष टेंबे आणि ज्येष्ठ खेळाडू व सदस्य माधव गोविंद पंडित यांनी दोन्ही खेळाडूंचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.