पनवेल : महानगरपालिका हद्दीतील तक्का, पोदी, काळुंद्रे व भिंगारी येथील नागरिकांसाठी तक्का मराठी शाळा क्रमांक ११ येथे तसेच कामोठे सेक्टर २१ येथील समाजमंदिर येथे नव्याने कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रभाग क्रमांक २० मधील तक्का मराठी शाळा क्रमांक ११ मध्ये तक्का, पोदी, काळुंद्रे व भिंगारी येथील नागरिकांसाठी केंद्राची उभारणी करावी, अशी मागणी नगरसेवक अजय बहिरा यांनी तर कामोठे शहरातील नव्याने दुसरे लसीकरण केंद्र सेक्टर २१ येथे सुरु करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक गोपीनाथ भगत यांनी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सदरची मागणी आयुक्तांकडे केली. या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सध्या देशभर सर्वत्र कोरोना (कोविड- १९) या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असून, सदरील विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये या करिता केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत, याच धर्तीवर सदरील विषाणूची लागण अन्य व्यक्तींना होऊ नये, याकरीता पनवेल महानगरपालिका प्रशासनामार्फत योग्यती कायदेशीर उपाययोजना केली जात आहे. मात्र पनवेल महानगरपालिका हद्दीतील वाढत्या कोरोना रुग्णांची सद्यस्थिती पाहता रुग्ण संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. पनवेल महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या लसीकरणाबाबतची सद्यस्थिती पाहता प्रभागातील नागरीकांना लसीकरण करण्याकरीता पनवेल महानगरपालिकेच्या ना.प्रा.आ.केंद्र- १, २, ३, ४, ५ व ६ केंद्रांवर जावे लागते त्यामुळे नागरीकांना लसीकरण केंद्रावर टोकन घेण्याकरीता रांगेत तासंतास उभे राहावे लागते. त्याचबरोबर लसीकरण केंद्रावर दिवसाला १०० ते १२५ नागरीकांचे दैनंदिन लसीकरण करण्यात येत आहे. परंतु केंद्राबाहेर ३०० ते ४०० नागरीकांची गर्दी दिवसेंदिवस दिसून येते त्यामध्ये फक्त १०० ते १२५ नागरीकांचे टोकन मिळून फक्त त्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरीत नागरीकांना टोकन न मिळाल्यामुळे पनवेल महानगरपालिका प्रशासनाबद्दल नागरीकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळे सदर उद्भवणाऱ्या समस्येवर उपाययोजना करणेकामी पनवेल महानगरपालिका प्रशासनामार्फत कोरोना बाधिन रुग्णांच्या संख्येत वाढ न होणेकरीता प्रशासनामार्फत तक्का येथिल मराठी शाळा क्रं. ११ येथे नव्याने लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात यावी तसेच कामोठे सेक्टर. २१ येथिल समाज मंदिर येथे देखील नव्याने लसीकरण केंद्र सुरु करावे. जेणेकरुन तक्का, पोदी, काळुंद्रे व भिंगारी तसेच कामोठे गावातील व शहरातील नागरीकांना लसीकरण करण्याकरीता होणारा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. तसेच प्रभागातील रहिवाश्यांना लसीकरण करणे देखील सोयीचे होईल. त्याचबरोबर नागरीकांना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहित करता येईल. जेणेकरुन कोरोना बाधित रुग्णांना त्यापासून वेळेत उपचार घेता येतील त्याचप्रमाणे नागरीकांची गैरसोय होणार नाही व नागरीकांना त्यापासून आधार मिळेल. याचबरोबर त्यांच्यामार्फत दैनंदिन प्रगती अहवाल याची नोंद घेणे ही सोयीचे होईल व नागरीकांना वेळेत लसीकरण घेता येईल. तरी या विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिका हद्दीतील तक्का, पोदी, काळंद्रे व भिंगारी तसेच कामोठे गावातील व शहरातील नागरीकांसाठी नव्याने लसीकरण केंद्राची उभारणी करण्याकरीता पनवेल महानगरपालिका प्रशासनामार्फत योग्य ती उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाला आदेश देण्यात यावे, असेही सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.