रायगड जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा इशारा

0
182

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला २४ तास सतर्क राहण्याचे आयुक्तांचे आदेश

पनवेल :

         हवामान खात्याच्या अंदाजानूसार दिनांक ९ जून ते १२ जून पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त श्री. सुधाकर देशमुख यांच्या आदेशानुसार पनवेल महानगरपालिकेत आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजनांसाठी महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विविधपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजनांसाठी कोविड रुग्णालयांचे व्यवस्थापन, विद्युत वितरण कंपनी, अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापनाशी संबधित महसूल विभाग, पोलिस प्रशासन तसेच इतर संलग्न विभागाशी संपर्कात राहून काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

        दिनांक ९ ते १२ जूनच्या दरम्यान अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याकारणाने आपत्कालीन व्यवस्थापन कक्षास २४/७ सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. अतिवृष्टीच्या काळात गरजेनूसार बोटी, शोध व बचावाचे साहित्य, बॅटरी, दोरखंड, क्रेन, जेसीबी असे सर्व साहित्याचे नियोजन करण्याचे आदेश अग्निशमन विभागास दिले आहेत. तसेच अतिवृष्टी काळात कोव्हिड रुग्णालयातील जनरेटरची सुविधा, ऑक्सीजनचा पुरवठा खंडीत होणार नाही या विषयी दक्षता घेण्याचा सूचना वैद्यकिय आरोग्य विभागास देण्यात आल्या आहेत.

        आपत्ती काळात रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या, झाडे बाजूला काढण्यासाठी आवश्यक मशिनरी, जे.सी.बी.,पोकलन, क्रेन, वूड कटर, अशा सर्व सामुग्रीचे नियोजन करण्याचे आदेश वृक्ष प्राधिकरण विभागास देण्यात आले आहेत. सखल भागातील साठलेले पाणी निचरा करण्यासाठीचे उपाययोजना ,नदी जवळील क्षेत्रात पाणी वाहते राहण्यासाठीची यंत्रणा,बोटी अशा सर्व गोष्टी सज्ज करण्याविषयीचे निर्देश संबधित विभागांना देण्यात आले आहेत.

         धोकादायक इमारती, जुनी घरे, रासायनिक उद्योग, कच्च्या घरात राहणारे नागरिक, जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था करण्याबाबत आवश्यक त्या सूचना आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या अधिकारी वर्गास तसेच प्रभाग अधिकारी यांना दिल्या आहेत.

अतिवृष्टी काळात पाणी पुरवठा सुरळित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, गरज पडल्यास टँकरची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

९ जून ते १२ जून या कालावधीमध्ये अतिवृष्टीच्या काळात झाडांखाली उभे राहू नये, वीजेच्या खांबाखाली उभे राहू नये. शक्य झाल्यास अतिवृष्टीच्या काळात घराबाहेर पडू नये.

  – धैर्यशील जाधव (सहाय्यक आयुक्त, पनवेल महानगरपालिका)