प्रशासन-लोकप्रतिनिधींवर सुज्ञ नागरिकाचा झणझणीत सवाल
येत्या २ मार्च रोजी होळीचा सण असल्याने मुंबई-पुण्यात नोकरी-व्यवसायासाठी गेलेले चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे परतणार आहेत. परिणामी मुंबई-गोवा महामार्ग तसेच माणगावातील अंतर्गत रस्त्यांवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या या समस्येमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर माणगावातील एका सुज्ञ नागरिकाने आपले नाव न जाहीर करता जेष्ठ पत्रकारांकडे पोस्टाद्वारे निवेदन पाठवले आहे. या निवेदनात प्रशासन व लोकप्रतिनिधींवर थेट प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, स्थानिकांच्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सणासुदीच्या काळात स्थानिकांना घराबाहेर पडणेही कठीण होते. त्यामुळे प्रवासी व पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांनी घराबाहेर पडू नये, शाळा-कॉलेजेस बंद ठेवावीत, दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात, व्यवसाय बंद ठेवावेत व अत्यावश्यक वस्तूंसाठीही बाहेर पडू नये, असा उपरोधिक सूर या पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.
स्थानिक आमदार-खासदारांना आपण मतदान करून निवडून देतो; मात्र त्यांची काळजी गाव सोडून गेलेल्या लोकांचीच का, असा सवालही करण्यात आला आहे. “गावात रोजगार नाही म्हणून लोक बाहेर जातात, हे कारण कितपत खरे? मग सध्या माणगावातील वाढती लोकसंख्या काय दर्शवते?” असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
तसेच, मोर्बा रोड कॉर्नर, बामणोली रोड कॉर्नर आणि जुनी पंचायत समितीसमोरील काही दुकाने अनधिकृत ठरवून मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तोडण्यात आली होती. मात्र न्यायालयीन निर्णयानंतरही नगरपंचायत कार्यालयासमोरील इतर दुकानांवर कारवाई का झालेली नाही, याबाबतही शंका व्यक्त करण्यात आली आहे.
महामार्ग रुंदीकरणाच्या मुद्द्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महामार्गाचे रुंदीकरण झाल्यास काही स्थानिक नेते व नगरपंचायतीतील लोकप्रतिनिधी यांचे व्यावसायिक हितसंबंध बाधित होतील, म्हणून कामाला विलंब होत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन अडचणींकडे दुर्लक्ष करून केवळ निवडणुकीच्या काळात मतांसाठी दार ठोठावले जाते, अशी खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
“गेल्या दीड दशकाहून अधिक काळ दरवर्षी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूप्रमाणे स्थानिकांची अवस्था झाली आहे. ही समस्या कॅन्सरमध्ये परिवर्तित होण्यापूर्वी यावर ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी आर्त मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, माणगावातील वाढती वाहतूक कोंडी, अंतर्गत रस्त्यांची अपुरी क्षमता आणि नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत असल्याचे चित्र आहे. संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.