जिल्हा सत्र न्यायालय ते पनवेल तालुका पोलीस स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर सम-विषम पार्कींग

0
81

वाहतूक पोलीस विभागातर्फे अधिसूचना जारी

पनवेल :  पनवेल जिल्हा न्यायालयात तसेच न्यायालयाच्या आजुबाजुला असलेले हॉस्पीटल आणि शासकीय कार्यालयांमध्ये येणार्‍या नागरिकांची संख्या मोठी असल्याने आणि नागरिक न्यायालयासमोरील रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने पार्क करत असतात. त्यामुळे न्यायालयाच्या रोडवर होणार्‍या वाहतूक कोंडीचा आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका, आग्नशमन अशा अत्यावश्यक सेवेतील वाहनांना अडथळा होण्याची शक्यता असल्याने वाहतूक विभागाकडून जिल्हा सत्र न्यायालय लोखंडीपाडा, अशोकबाग आणि पनवेल तालुका पोलीस स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर सम-विषम पार्कीगची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
पनवेल जिल्हा सत्र न्यायालय लोखंडीपाडा आणि अशोकबाग यांच्या मधून पनवेल तालुका पोलीस स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे. सदर रस्त्यावर न्यायालय परिसर आणि आजुबाजुला खाजगी हॉस्पीटल, पोलीस उपआयुक्त कार्यालय, तालुका पोलीस ठाणे आदी महत्वाची शासकीय कार्यालये आहेत. तसेच न्यायालयाच्या समोरील बाजुस निलपार्क, शितल, गुरुकुल आणि पवन अशा चार रहिवाशी सोसायट्या देखील आहेत. पनवेल न्यायालयासमोरील रस्त्याची लांबी 150 मीटर आणि रुंदी 40 फुट असून न्यायालयात कामकाजासाठी येणारे नागरिक आपली चारचाकी आणि दुचाकी वाहने तेथील रस्त्याच्या दोन्ही बाजुस अस्ताव्यस्त पार्क करत असतात. त्याशिवाय न्यायालयाच्या आजुबाजुला असलेले हॉस्पिटल आणि शासकीय कार्यालयांमध्ये येणार्‍या नागरिकांची वर्दळ जास्त असल्याने त्याचा परिणाम न्यायालयाच्या रोडवरील वाहतूक कोंडीवर होत असल्याचे आढळून आले आहे. आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल अशा अत्यावश्यक सेवेतील वाहनांना अडथळा होण्याची शक्यता असल्याने न्यायालयाच्या रोडची लांबी आणि रुंदीचा विचार करता सदर रोडवर नो-पार्कींग करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक विभागाकडून जिल्हा सत्र न्यायालय लोखंडी पाडा आणि अशोकबाग आणि पनवेल तालुका पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर सम-विषम पार्कीगची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदरची अधिसूचना 18 जानेवारी 2022 रोजी पासून पुढील आदेश होईपर्यंत अंमलात राहणार असल्याचे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.