मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात मद्यधुंद रुग्णाचा धिंगाणा ; हॉस्पिटलची तोडफोड

0
172

कोर्लई :  मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात मद्यधुंद अवस्थेत आलेल्या रुग्णास डॉक्टरांनी चिठ्ठी देऊन अलिबाग जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला असता त्याने चक्क रुग्णालयाची तोडफोड केली.याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय हाडबे यांनी रुग्ण मंगेश जगताप याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे समजते.

     दि 07 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा दारूच्या व्यसनाधीन झालेला रुग्ण डॉक्टरांनी एडमिट करून घेतला. रात्री 8.30 वा तो मानसिकरित्या पूर्णतः शुद्धीत नसल्याने त्याला अलिबाग येथे जाण्यास संदर्भ चिठ्ठी देऊन जाण्यास सांगितले. परंतु तो जाण्यास अजिबात तयार नव्हता, अशावेळी रुग्णालयामध्ये एकही सुरक्षा रक्षक नाही त्यामुळे त्याला कोणी बाहेर काढू शकले नाही. तो रात्री रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घालत राहिला. मध्यरात्री 2.30 ला दि 8/02 त्याने लोखंडी रॉड च्या साहाय्याने सामान्य वॉर्ड, प्रयोग शाळा, तातडीचा विभाग व प्रसूती रूम मधील सर्व दवाज्यांच्या आणि खिडक्यांच्या काचा फोडल्या, प्रयोग शाळेतील कपाट, फ्रीज, तसेच इतर साहित्य तोडफोड केली, बाहेर ठेवलेले पाण्याचे कूलर तोडले, प्रसूती रूम मधील सर्व साहित्यांची तोडफोड केली आणि लोखंडी रॉड घेऊन रुग्णालयात ड्युटी वर असलेल्या महिला कर्मचायांच्या अंगावर धाव घेतली, तो ही तोडफोड सुमारे 1 तास करत राहिला पण रुग्णालयात काम करणाऱ्या बहुतांश महिला कर्मचारी असल्याने त्याला कोणीच अडवू शकले नाही.

 सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे मागच्या 3 महिन्याच्या काळात रुग्णालयाला पाणी पुरवठा करणारी मोटार सुद्धा 2 वेळा चोरीला गेली. बहुतांश कर्मचारी या महिला आहेत. रात्री बेरात्री महिला रुग्णालयात काम करताना संपूर्ण असुरक्षितता असून याठिकाणी सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे. असे वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय हडबे यांनी सांगितले.