रायगड पोलिसांनी वर्षभरात केले ९४ कोटींचे अमलीपदार्थ जप्त

0
35

केटामाईन, एमडी, चरससह गांजा १२४ किलो माल पोलिसांकडून हस्तगत ;२६गुन्हे दाखल; ३२ जणांना अटक

अलिबाग :
रायगड जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात रायगड पोलिसांनी मागील वर्षभरात धडक कारवाई करीत अंमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडले आहे. पोलिसांनी वर्षभरात अंमली पदार्थ विरोधी २६ कारवाया करत याप्रकरणी ३२ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
या कारवाईत पोलिसांनी १२३ किलो ७६८ ग्रॅम वजनाचे सुमारे ९४ कोटी ४५ लाख ७८ हजार ७७५ रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. रायगड पर्यटन दृष्ट्या महत्त्वपूर्ण असून, जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. तसेच औद्योगिक जिल्हा म्हणून नावारूपाला येत आहे. त्यामुळे येथे नोकरी निमित्ताने येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अंमली पदार्थ तस्करांना गांजा, चरस, मेफेड्रोन, केटामाईन यांसारख्या अमली पदार्थांना ग्राहक मिळत असल्याचे दिसून येते. अंमली पदार्थ तस्करांवर कारवाईसाठी रायगड पोलिसांनी कारवाई हाती घेतली असून, वर्षभरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
रायगड पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करीत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान एकूण २६ गुन्हे दाखल केले आहेत. त्यात ३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत रायगड पोलिसांनी ५० किलो ६८७ ग्रॅम केटामाईन हा अंमली पदार्थ जप्त केला असून, जप्त केटामाईनची किंमत ८८ कोटी ९२ लाख २५ हजार इतकी आहे. तसेच मागील वर्षभरात पोलिसांनी ४ कोटी २२ लाख ७६ हजार रुपये किंमतीचा ४ किलो ७६ ग्रॅम एम.डी.,१ कोटी १९ लाख ४५ हजारांचा २३ किलो ८९० ग्रॅम चरस, ११ लाख ३२ हजार ७७५ रुपयांचा ४४ किलो ४३१ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.