Home ठळक बातम्या उघड्यावरील कचरा शोधून ग्रामपंचायतला सूचना देऊन कार्यवाही करण्यासाठी पथकाची निर्मिती

नवीन पनवेल : ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या आजूबाजूला, नदी काठालगत टाकण्यात येणाऱ्या कचऱ्या संदर्भात पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकाने उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या कचरा शोधून संबंधित ग्रामपंचायतीला लेखी सूचना पत्र देण्याचे आदेश गटविकास अधिकारी समीर वाठारकर, पनवेल पंचायत समिती यांनी दिले आहेत.
घनकचरा व्यवस्थापना करता तयार केलेले नियम, घनकचरा व्यवस्थापन नियमा अंतर्गत ग्रामपंचायतने ग्रामपंचायतीच्या हद्दीत घनकचरा आणि स्वच्छता विषयक पार पाडावयाची जबाबदारी निश्चित केलेली आहे. पनवेल तालुक्यात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. पनवेल तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने होण्याकरता पनवेल पंचायत समिती मार्फत वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. 71 ग्रामपंचायत मधील निवासी औद्योगिक आणि वाणिज्यिक आस्थापनामधून तयार होणारा घनकचरा ग्रामपंचायतीमार्फत संकलित होत आहे. तरीही ग्रामपंचायत हद्दीमधील निवडक ठिकाणी म्हणजे रस्त्याच्या बाजूला, नदी काठा लगत, वनविभागाच्या हद्दीमध्ये ठीकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे निदर्शनास येत आहेत. हे कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी पसरत आहे. त्याचा दुष्परिणाम म्हणजे ग्रामस्थांना भटके कुत्रे, मोकाट जनावरे आणि इतर आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. दत्तू हिंदोळा, ओमकार पाटील, प्रतीक पाटील यांना 35 ग्रामपंचायती तर दिलीप झावरे, मनीषा साळवे, सायली म्हात्रे, दीप्तीश पाटील यांनी 36 ग्रामपंचायती हद्दीतील पंचायतींवर भेट देऊन ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो त्या शोधून त्या दिवशी संबंधित ग्रामपंचायतीला लेखी सूचना पत्र देण्यासाठी सांगितले आहे. सूचनापत्रानुसार ग्रामपंचायतीला यावर कार्यवाही करणे गरजेचे आहे.
—