पनवेलमध्ये मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

0
177

महिला सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध- अदीती सोनार

पनवेल:

        महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मनसेचे नेते अमित राज ठाकरे यांच्याहस्ते आज (शुक्रवार दि.११ फेब्रुवारी) पनवेलमधील ठाणा नाका रोड येथे करण्यात आले. रायगड मनसे महिला जिल्हाध्यक्षा आदिती सोनार यांच्या पुढाकाराने राजमाता जिजाऊ गड या नावाने पनवेलमध्ये मध्यवर्ती कार्यालय उभारल्याने मनसेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी आमदार राजू पाटील, नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे, स्नेहल जाधव, जिल्हाध्यक्ष अतुल भगत, विद्यार्थि सेना जिल्हाध्यक्ष अक्षय काशीद, अक्षय सुतार, वर्षा पाचभाई, प्रिती खानविलकर, स्वरूपा सुर्वे, रुपाली मुरकुटे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

       यावेळी मनसे महिला जिल्हाध्यक्षा अदिती सोनार या म्हणाल्या की, आज समाजात महिलांना जगताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या अनुषंगाने मनसे महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत. समाजात कुठेही महिलेवर अन्याय झाल्यास त्याठिकाणी सर्वप्रथम मनसे महिला आघाडी पोहोचलेली असेल अशी ग्वाही सर्व महिलांच्या वतीने देते. महिलांच्या कोणत्याही समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवा, जनसेवेसाठी कायम याठिकाणी आम्ही कटिबद्ध आहोत. महिलांसाठी अनेक योजना आहेत, परंतु अनेक महिला या योजनांपासून अद्यापही वंचित आहेत. महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या योजनांचा परिपूर्ण अभ्यास करून त्या महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी व महिलांना त्या योजनांचा सुलभतेने लाभ मिळवून देण्यासाठी विशेष पाऊल उचलले जाईल, असेही अदिती सोनार म्हणाल्या.

       काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकानात वाईन उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाला शंभर टक्के नकारघंटाच आहे. वाईन हा अल्कोहोलिक पदार्थ आहे. वाईन मधून कितीही सरकारला महसूल मिळणार असला तरीही इंधन, रस्ते यामधून मिळणारा कर सरकारला कमी पडतोय का? काही दिवसांनी ‘गाव तिथे गुत्ता’ अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण होईल. या निर्णयामुळे तरुण पिढीचे भवितव्य उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही, अशीही प्रतिक्रिया अदिती सोनार यांनी यावेळी व्यक्त केली.