बालाजी सिंम्पोनी सोसायटीमध्ये लागलेल्या आगीत एक महिला ठार ; एक जखमी

0
174

पनवेल :  पनवेल जवळील सुकापूर येथे असलेल्या उत्तुंग अशा बालाजी सिंम्पोनी सोसायटीमधील 28 व्या मजल्यावरील एका ब्लॉकला आज दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत एक महिला आगीत होरपळून मृत्यू पावली आहे. तर एक महिला जखमी झाली असून तिला एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
आज दुपारच्या सुमारास बालाजी सिंम्पोनी येथील 2805 या ब्लॉकमध्ये अचाकनपणे आग लागून या आगीत एक महिला होरपळून मृत्यू पावल्याचे समजते. तर एक महिला जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्‍वर पोलिसांचे पथक व अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना होवून आगीवर नियंत्रण मिळविले आहे. सदर महिला या कोणत्या कारणामुळे या आगीत होरपळल्या तसेच हा घातपाताचा तर प्रकार नाही ना? याबाबत अधिक तपास खांदेश्‍वर पोलीस करीत आहेत. दरम्यान सोसायटीला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेजण त्याच मजल्यावरुन गडबडीने बाहेर पडताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे येथे असलेले सुरक्षा रक्षक व इतर नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या घटनेचा उलगडा करण्याचे आव्हान खांदेश्‍वर पोलिसांसमोर आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सदर दोन महिलांची अधिक माहिती घेण्याचे काम खांदेश्‍वर पोलीस करीत आहेत.