जेएनपीटीच्या प्रशासन भवनाला आधुनिकतेचा साज ; 40 कोटी खर्चून कार्पोरेट लूक !

0
233

उरण : मागील 35 वर्षांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या आणि देशातील 11 प्रमुख बंदरांच्या जलमार्गातील एकूण माल वाहतूकीच्या 54 टक्के वाटा उचलणाऱ्या जेएनपीटी प्रशासन भवनाला आधुनिकतेचा साज चढविण्यात आहे. 40 कोटी खर्चून कार्पोरेट लूक बरोबरच आबालवृद्ध आणि अपंगांना आता लिफ्टचा आधार मिळणार आहे. देशातील प्रमुख आणि युवा पोर्ट म्हणून जेएनपीटी बंदराची ओळख आहे. दरवर्षी या बंदरातुन 50 लाखांहून अधिक कंटेनर मालाची हाताळणी केली जाते. लवकरच चौथे बंदर पुर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल.त्यानंतर दरवर्षी बंदरातुन एक कोटी कंटेनर मालाची आयात निर्यात केली जाणार आहे. 277 हेक्टर क्षेत्रावर देशातील सर्वात मोठा जेएनपीटीचा महत्वाकांक्षी सेझ प्रकल्प सुरू आहे. जेएनपीटीच्या सेझच्या या प्रकल्पात जवळपास देशी विदेशी कंपन्यांकडून एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध देण्यात जेएनपीटी प्रशासन नेहमीच अग्रेसर राहिले आहे. जेएनपीटी बंदराच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीच्या जोरावर बंदर जागतिक स्तरावर पहिल्या 26 क्रमांकावर आहे.आधुनिकतेची जोड देऊन जागतिक स्तरावरील पहिल्या 10 क्रमांकात जेएनपीटी बंदराला स्थान मिळवून देण्याची जेएनपीटी अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जेएनपीटी बंदराचे प्रशासन भवन मागील 35 वर्षांपासून नुतनीकरणाच्या प्रतिक्षेत होते. सध्या तरी व्यापार,उद्दीम करणाऱ्या बहुतांश विविध मल्टीनॅशनल कंपन्यांची कार्यालये कार्पोरेट लूकमध्येच आढळून येतात. अशी कार्यालये छाप पाडण्यासाठी व व्यापार उद्दीम वाढीसाठीही उपयुक्त ठरतात. त्यामुळे दरवर्षी सुमारे 1100 कोटीहुन अधिक नफा कमाविणाऱ्या जेएनपीटी प्रशासनानेही 35 वर्षे जुन्या असलेल्या प्रशासन भवनाला आधुनिकतेचा साज चढविण्यासाठी कार्पोरेट लूक देण्याची योजना आखली होती. 40 कोटी खर्चाच्या योजनेत जुने प्रशासन भवनाचे पहिल्यांदाच नुतनीकरणा बरोबरच 8 हजार चौरस मीटर क्षेत्रात दोन मजली इमारतीमध्ये प्रशस्त कार्यालयांना नव्या फर्निचरचा आकर्षक साज चढविण्यात आला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी प्रशस्त केबीन नव्याने पोर्च आणि अधिकारी, व्हीआयपी,तसेच आबालवृद्ध, अपंगांना आता दुसऱ्या मजल्यावर ये-जा करण्यासाठी लिफ्टची सोय केली आहेच. त्याशिवाय संपूर्ण प्रशासन भवनच वातानुकुलीत करण्यात आले आहे. जेएनपीटीच्या प्रशासन भवनाला कार्पोरेट लूक देणे ही काळाची गरज होती. 18 महिन्याच्या मुदतीत नुतनीकरण करण्यात आले असल्याच्या प्रतिक्रिया जेएनपीटी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.