पुर्वसुचना न देता पुन्हा बोर्ली ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित

0
1202

महावितरण व ग्रामविकास खात्याच्या समन्वयाच्या अभावाचा ग्रामस्थांना त्रास : चेतन जावसेन

कोर्लई :  कोणतीही पुर्वसुचना न देता महावितरणने ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला मुरुड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींसह बोर्ली ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा दि.२६ मे पासून खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून पथदिव्यांचा वीजपुरवठा पुन्हा खंडित होण्यामागे महावितरण व ग्रामविकास खात्याची समन्वय साधण्यात निश्क्रियता कारणीभूत ठरत असून याचा त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागतो आहे. अशी प्रतिक्रिया बोर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन जावसेन यांनी व्यक्त केली आहे.

    ऐन पावसाळ्याच्या तोंडावर तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा कोणतीही पूर्व सुचना न देता बंद करण्यात आल्याने  ग्रामस्थांना रात्रौ-अपरात्रौ विषारी साप आणि विंचू जीवजिवाणू पासून वेळप्रसंगी केव्हाही जिवितास धोका, अपघाताची शक्यता लक्षात घेऊन तातडीने पथदिव्यांचा वीजपुरवठा पुर्ववत सुरू राहणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामपंचायतीचे पथदिवे सुरू राहाण्यात सरपंचांची महत्त्वाची भूमिका असून वीजबिलाच्या थकित वीजदेयकाची समस्या सोडवण्यात शासनाच्या महावितरण व ग्रामविकास ‌‌‌‌‌‌खाते यांनी समन्वय साधून आपल्या पातळीवर प्रश्न सोडविणे गरजेचे आहे आणि जर पथदिव्यांची थकित वीज देयके ही ग्रामपंचायतींने अदा करणे अपेक्षित असेल तर तशा प्रकारचा आराखडा ग्रामपंचायतीकडे पाठविण्यात यावा व त्याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे. परंतु तसे होत नसल्यानेच आपण ग्रामपंचायत पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यात हतबल झालो असल्याची भावना चेतन जावसेन यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.