पाण्याच्या प्रवाहात वाहत जाणाऱ्या दोघांना पनवेल तालुका पोलिसांनी वाचवले

0
17

पनवेल : गाढेश्वर धरण परिसरात पोहण्यास गेलेल्या व पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहत चाललेल्या दोघांना बाहेर काढण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे. सोहेल खावजौद्दिन अहमद शेख व मनोज शंकर गांगुर्डे अशी दोघांची नावे आहेत

       पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील नेरे बीट मध्ये पोलीस गस्त करीत असताना 15 जुलै रोजी दुपारी १२ च्या सुमारास गाढेश्वर नदीपात्रात दोन इसम पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन पाण्यात अडकून असल्याचे पोलिसांना दिसले. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे, तुकाराम कोरडे , संदीप पाटील, धनंजय पठारे, कांबळे, जाधव यांनी तात्काळ दोरीच्या साहाय्याने दोघांना सुखरूप बाहेर काढले. सोहेल खावजौद्दिन अहमद शेख व मनोज शंकर गांगुर्डे अशी दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेमुळे या दोघांना वाचवण्यात यश आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.

          पनवेल तालुक्यातील गाढेश्वर (देहरंग) धरण परिसरात पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात मजा लुटण्यासाठी हजारो पर्यटकांच्या झुंडी शनिवार व रविवारी येत असतात. अति उत्साहामुळे काही पर्यटक खोल पाण्यात उतरतात व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आपल्या जीवाला मुकतात. त्यामुळे गाढेश्वर धरणाकडे जाण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मात्र तरीदेखील काही उत्साही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून धरणाकडे जातात अशाच प्रकारे काही तरुण आज परिसरात गेले व त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. त्यांचे दैव बलवत्तर म्हणून पोलिसांनी दोरीच्या साहाय्याने त्यांना बाहेर काढले. त्यामुळे या परिसरात पर्यटकांनी जाऊ नये असे आवाहन केले जात आहे. पर्यटकांनी पाण्यात उतरू नये व स्वताचा जीव धोक्यात घालू नये असा संदेश पोलिसांकडून देण्यात येत आहे. या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचारी यांना सतर्क  राहण्याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्याकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत.