राज्यसरकारची यंत्रणा सज्ज एनडीआरएफ टीम, स्थानिक रेस्क्यू टीम तैनात – अदिती तटकरे

0
23

मुंबई – आज रेड अलर्ट असला तरी उद्या हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे त्यामुळे पाऊस कमी होईल मात्र तरीही एनडीआरएफच्या टीम, स्थानिक रेस्क्यू टीम तैनात ठेवण्यात आल्या आहेत. रेस्क्यू करण्याची वेळ जरी आली तरी रेस्क्यू व एनडीआरएफची टीम तैनात आहे असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आणि रायगड जिल्हयाच्या माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी रायगडवासियांना दिला आहे.
मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात परिस्थिती बिकट झाली असून इथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांची योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे अदिती तटकरे यांनी विधानभवनाच्या परिसरात माध्यमांशी बोलताना सांगितले. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या शक्यतेनुसार मंगळवारीच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले.
महाड, पोलादपूर, माणगाव परिसरात एनडीआरएफची पथके दोन दिवसापासून तैनात करण्यात आली आहेत. ज्या – ज्या गावात पाणी भरले आहे त्याठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संपर्क झाला आहे. पाताळगंगा, सावित्री आणि आंबा या तीन नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे तर कुंडलिका नदीने अद्याप धोक्याची पातळी गाठलेली नाही. पण महाड शहरात काही प्रमाणात पाणी भरलेले आहे. ते पाणी लवकरच ओसरेल अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. सरकारकडून जी – जी खबरदारी घ्यायची आहे ती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील तहसीलदार व प्रांत कार्यालयाकडून माहिती दिली जात आहे. २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यापरिस्थितीनुसार ज्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे उपाययोजना इथे केल्या जात आहेत. आम्ही वेळोवेळी नागरीकांशी, यंत्रणेच्या संपर्कात आहोत असेही अदिती तटकरे यांनी सांगितले.
पोलादपूरपासून महाबळेश्वर घाट रस्ता वाहतूकीसाठी बंद आहे. ज्या पुलावरून पाणी जात आहे त्यामध्ये म्हसळा, माणगाव, महाड, अलीबाग, पेण, उरण येथील रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहे. आम्ही सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असेही अदिती तटकरे यांनी सांगितले.