अलिबाग : मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार प्रत्येक बालकाला शिक्षण हक्क मिळवून देण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये आरटीईचे प्रवेश केले जाणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाकडून नुकतीच 84 हजार 446 शाळांपैकी 75 हजार 848 शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. लवकरच आरटीईच्या प्रवेशसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आणि त्यासाठीची कार्यवाही सुरू केली जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.
जूनपासून सुरू होणार्या नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सरकारी, अनुदानित आदी शाळांमध्येही आरटीईच्या प्रवेशाला प्राधान्य दिले जाणार आहे. एक किमी परिसरात असलेल्या सरकारी, अनुदानित शाळांच्या परिसरातील खासगी शाळांमध्ये आरटीईचे प्रवेश केले जाणार नसल्याने यावेळी आरटीई प्रवेशासाठी शाळांची संख्या ही 84 हजार 446 पर्यंत येऊन पोहोचली आहे. यातील 75 हजार 848 शाळांची नोंदणी पूर्ण झाली असल्याने या शाळांमध्ये लाखो जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध होणार आहेत. या नोंदणी झालेल्या शाळांमध्ये मुंबईत दोन हजार 463 शाळा असल्या, तरी त्यापैकी केवळ एक हजार 381 इतक्याच शाळांची आरटीई प्रवेशासाठीच्या नोंदणीनंतर पडताळणी पूर्ण झाली आहे. शाळा पडताळणी झाल्या त्याची संख्या खूप कमी असून मुंबईपेक्षा राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये नोंदणी आणि त्यांनतर पडताळणी करणार्या शाळांची संख्या अधिक आहे.
मुंबई शिक्षण उपसंचालक विभागातील शाळा
विभाग एकूण शाळा नोंदणी केलेल्या शाळा
मुंबई 2,463 1,381
ठाणे 3,387 2,611
रायगड 3,044 2,890
पालघर 2,678 2,410