जन्मदात्या आईला ठार मारण्याचा रचला मुलीनेच कट ; मुलीसह दोन आरोपी गजाआड

0
225

पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः स्वतःच्या जन्मदात्या आईलाच ठार मारण्याचा कट मुलीने रचला व त्यात ती यशस्वी झाली. परंतु पनवेल शहर पोलिसांच्या सखोल तपासामध्ये अखेरीस हे निष्पन्न झाले व त्यांनी कट रचणार्‍या मुलीसह प्रत्यक्ष खुन करणार्‍या दोघा तरुणांना गजाआड केले आहे.
प्रिया नाईक असे मृत आईचे नाव असून याप्रकरणी मुलगी प्रणाली प्रल्हाद नाईक, विवेक पाटील व विशाल पांडे या तिघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून बाहेर फिरण्यास तसेच मोबाईल वापरास आईकडून निर्बंध घातले जात असल्याच्या रागातून मुलीने हे पाऊल उचलल्याने तपासात समोर आले आहे. मुलगी प्रणाली ही विवाहित असून तिला पाच वर्षांची मुलगी आहे. पतीसोबत न पटल्याने ती दोन वर्षांपासून पनवेल येथे माहेरी राहण्यास आली आहे. यादरम्यान आई प्रिया यांनी प्रणालीवर बाहेर ये-जा करण्यास, फोनवर बोलण्यास बंधने घातली होती. ती बाहेर गेल्यास तिला सतत फोन करणे, मोबाईलची तपासणी करीत होती. आईच्या या निर्बंधांना ती वैतागली होती.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी विवेक पाटील हा प्रणालीला बहीण मानत होता. विवेकला पैशांची गरज असल्याने त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. प्रणितालाही आईच्या निर्बंधातून सुटका करून घ्यायची असल्याने तिने विवेकला 10 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली; मात्र त्याबदल्यात आईची हत्या करण्यास सांगितले. पैशाची गरज असल्याने विवेकने ही ऑफर स्वीकारली. मित्र विशाल पांडे याच्या मदतीने विवेकने 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रिया या घरात एकट्याच असताना वायरने गळा आवळून त्यांची हत्या केली.
रात्री प्रिया यांचे पती प्रल्हाद नाईक हे घरी आले असता प्रिया बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. त्यांनी तातडीने प्रिया यांना रुग्णालयात दाखल केले; पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत पनवेल शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदन अहवालात प्रिया यांची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत मोहिते, पोलीस उपायुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि नितीन ठाकरे, पो.नि.प्रवीण भगत यांच्यासह सपोनि प्रकाश पवार, सुनील वाघ, राजेंद्र घेवडेकर, सुषमा पाटील, स्वप्नील केदार, पोउपनिरीक्षक विनोद लभडे, पो.हवा.परेश म्हात्रे, वाघमारे, वायकर, भोसले, डोईफोडे, शेवाळे, पाटील, सोनवणे, पो.ना.महेश पाटील आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे शोध सुरू केला असता अधिक तपासात विवेक आणि विशाल यांनी प्रिया यांची हत्या केल्याचे उघड झाले. दोघांची चौकशी केली असता, प्रणालीने दिलेल्या सुपारीनुसार प्रिया यांची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी प्रणितालाही अटक केली. या आरोपींना पनवेल न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपींची दि.23 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहेे. त्यामुळे अजून गुन्ह्याची उकल होणार असल्याची माहिती सहा.पो.आयुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.