रेमीडीसीव्हर इंजेक्शन मेडीकल किंवा काळ्या बाजारात खरेदी करू नका

387
1007

पनवेल : रेमीडीसीव्हर या इंजेक्शन ची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, हे इंजेक्शन डाॅक्टरांनी जरी लिहून दिले तरी बाहेरच्या मेडिकल मध्ये कुठेही मिळणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीमार्फत, रुग्ण ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे,फक्त त्या हाॅस्पिटललाच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल असा सरकारचा आदेश आहे. त्यामुळे रेमीडीसीव्हर इंजेक्शन तुम्ही मेडीकल मधून किवा काळया बाजारातून खरेदी करू नका रेमडेसिवीर इंजेक्शन नातेवाईकांना बाहेर मिळणार नाही. काळ्या बाजारातून तुम्ही औषधे घेत असाल तर फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे नातेवाईकांनी आपला महत्वाचा वेळ खर्च न करता हाॅस्पिटल प्रशासनाकडेच त्याची वारंवार मागणी करावी. ज्यांना इंजेक्शनची गरज आहे त्यांनी आधी खालील मुद्दे लक्षात घेऊन डाॅक्टरांशी चर्चा करावी.
१) डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिल्यावर त्यांना सांगा की, “हे इंजेक्शन हॉस्पिटलनेच मागवायचे आहे. तुम्ही आमच्या पेशन्टसाठी हे इंजेक्शन गरजेचे आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे का?”
२) “जिल्हाधिकारी कोविड वाॅर रुम “ला कळविले असल्यास आमच्या पेशन्टचा इंजेक्शनसाठी चा वेटिंग नंबर काय आहे?”
३) डाॅक्टरांनी तरीही बाहेरून उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरल्यास डाॅक्टरांकडून “सदर इंजेक्शन आमच्या हाॅस्पिटलमध्ये उपलब्ध नसल्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून आणावे लागेल” असे प्रिस्क्रिप्शन लेटरवर लिहून घ्यावे. तोंडी सूचना घेऊ नये.
४) आपल्या जिल्ह्यातील कोव्हिड वॉर रूम ला संपर्क करा.
सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक पेशन्ट ला इंजेक्शन हॉस्पिटलमध्येच उपलब्ध होणार आहे, याची नोंद घ्या.
बाहेर कोणत्याही मेडीकलमध्ये ते मिळत नाही.
आपली वैद्यकीय इंजेक्शन आणि औषधे समिती तसेच मेडीकल मदत कक्ष यातील सदस्य सतत सर्व मेडिकलशी संपर्क साधून आहे. याशिवाय महत्त्वाचे- रेमडेसिवीर इंजेक्शन द्यावे की न द्यावे यासाठी पेशंटचे वय, पूर्वीपासून असलेले शारीरिक आजार, पेशंटचा HRCT Score, सध्याचे आॅक्सिजनचे रक्तातील प्रमाण, शारीरिक लक्षणे इ. विविध घटक विचारात घेऊन निर्णय घेतला जातो. बऱ्याच हाॅस्पिटल मध्ये या इंजेक्शन शिवाय देखील बरे झालेले अनेक रुग्ण आहेत. त्यामुळे इंजेक्शन देण्याबद्दल आपल्या डाॅक्टरांशी चर्चा करावी, संवाद वाढवावा. इंजेक्शन उपलब्ध होत नसताना, गडबडून जाऊन काळ्या बाजारातून चढ्या भावाने खरेदी करण्याचा अनावश्यक मोह टाळावा. अशामुळे पेशंटला उपाय होण्याऐवजी अपाय होण्याचीच शक्यता जास्त असते.