चक्री वादळादरम्यान महावितरण कर्मचारी दिवसरात्र कर्तव्यावर

20
267

पनवेल :

चक्रीवादळ म्हटलं की सर्वांचाच थरकाप होतो, आणि यात सर्वाधिक जबाबदारी आणि कामाचा ताण महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर येतो. गतवर्षी ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा आणि आताच्या ताउत्की चक्रीवादळाचा तडाखा यामध्ये जरी तफावत असली तरीही चक्रीवादळाचा सर्वाधिक ताण हा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना होत असतो. त्यामुळे पनवेल विभागातील विद्युत पुरवठा बंद होवू नये म्हणून दिवसरात्र मेहनत घेण्यात आली. येथील अभियंता ननोटे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या साथीने शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी यशस्वी काम केले.

शहरातील अवाढव्य वृक्ष जे कोणत्याही परिस्थितीत उन्मळून कोसळू शकतात, तसेच विद्युत वाहिन्यांचे नुकसान करून विद्युत पुरवठा खंडित करू शकतात अशा वृक्षांच्या फांद्या छाटण्यापसून ते गेले कित्येक दिवस अहोरात्र काम करीत होते. सुदैवाने ताउत्की चक्रीवादळ आपला मार्ग न बदलता समुद्र किनारपट्टीपासून सुमारे १२५ किमी दुरहून गेल्यामुळे मोठी वित्तहानी आणि जीवितहानी टळली आहे. मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांना उत्तम सुविधा देण्यासाठी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी कायमच कटिबध्द असल्याचे आता यामुळे समोर आले आहे. त्यामुळे पनवेल शहर विभागाचे अभियंता श्री. नानोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.