सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणांचा समन्वय व नागरिकांची साथ यामुळे चक्रीवादळापासून होणारी मोठी हानी रोखण्यास यश

21
148

अलिबाग (जिमाका) :-  “ताउक्ते”  चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. वादळीवाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरींमुळे जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद प्रशासन, महसूल विभाग, पोलिस प्रशासनासह इतर सर्व शासकीय विभाग यांनी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी जनजागृती करण्यासोबतच योग्य समन्वयाने नियोजन केले होते. त्याला नागरिकांची सकारात्मक साथ मिळाली. यामुळे मोठ्या प्रमाणात हानी टाळता आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.‌ किरण पाटील यांनी दिली.

     “ताउत्के” चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी शासकीय स्तरावर मोठी तयारी करण्यात आली होती. यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी , जिल्हा परिषद प्रशासन, महसूल विभाग, पोलिस प्रशासनासह इतर सर्व शासकीय विभाग यांनी एकत्रित काम केले. चक्रीवादळादरम्यान नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती.

      चक्रीवादळापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी समुद्रकिनारी तसेच चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणाऱ्या क्षेत्रातील कच्या किंवा मोडकळीस आलेल्या घरांमधील २ हजार २६३ कुटुंबांमधील ८ हजार ३८३ नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थळांतर करण्यात आले होते. याकामी महसूल विभागासोबत ग्रामपंचायत प्रशासनाने कंबर कसली होती. स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांची योग्य ती काळजी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने घेतली होती. तसेच आरोग्य व्यवस्था सुरळीत राहील यासाठी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या. वेळोवेळी सर्व विभागांचे जिल्हा स्तरावरील अधिकारी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत होते.

      सोमवारी दुपारपर्यंत चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील 1 हजार 784 घरांचे अंशत: नुकसान तर 5 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. एकूण 3 व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 2 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. ठिकठिकाणी विद्युत पोलचे नुकसान झाले आहे. झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.‌ किरण पाटील यांनी दिली.