पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस दरवर्षी भारतीय जनता पक्ष व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध समाजोपयोगी कार्यक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण, शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजातील वेगवेगळ्या घटकांना आवश्यक ती मदत देणे, क्रीडाविषयक कार्यक्रम, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव असे अनेक कार्यक्रम होत असतात. सध्या कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात तसेच पनवेल महापालिका क्षेत्रात आहे.
2020 साली कोरोना काळात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजपतर्फे पनवेल तालुका व महापालिका क्षेत्रातील चार लाख व्यक्तींना आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप, तसेच सुमारे 60 हजार गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्य, कडधान्य इत्यादी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत या पुरस्काराने लोकनेते रामशेठ ठाकूर यांना गौरविण्यात आले होते.
या वर्षीही लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 70वा वाढदिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले होते. या विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यासंदर्भात व कार्यक्रम राबविण्याविषयी पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या वेगवेगळ्या 30 कमिट्यांची स्थापना करून त्यांच्यावर जबाबदारीही टाकण्यात आली होती. त्या दृष्टिकोनातून कार्यकर्तेही कामाला लागले होते, मात्र दुर्दैवाने मार्च महिन्याच्या अखेरपासून पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात व पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागल्यामुळे नियोजित केलेले कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे रोज दैनंदिन मोलमजुरी करणारे श्रमजीवी कामगार, रिक्षाचालक, छोटे व्यावसायिक यांचा रोजगार बुडाला असून, त्यांची दैनंदिन रोजीरोटी पूर्णपणे बुडालेली आहे. अनेक गरीब कुटुंब आर्थिक विवंचनेत असून, त्यांना दोन वेळचे जेवण मिळणेही मुश्कील झाले आहे.
या अनुषंगाने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजपतर्फे सामाजिक बांधिलकीतून गरीब, गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे ठरविण्यात आले आहे. या जीवनाश्यक वस्तूंचे सुयोग्य पद्धतीने वाटप होण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू झाले असून, पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब व गरजू व्यक्तींना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपली नावे भाजप पनवेल ग्रामीण मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत (9930655223), पनवेल शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे (9322868140), खारघर शहर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल (9324268633), कळंबोली शहर मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील (8097697578), कामोठे येथील नगरसेवक विजय चिपळेकर (9819717134) यांच्याकडे द्यावीत, जेणेकरून नागरिकांना त्यांची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य नियोजन करण्यास सोयीचे होईल.
भाजपच्या पनवेल तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या अनुषंगाने कळवण्यात येते की, आपल्या शहरातील व गावातील गरजू कुटूंबांना भाजपच्या वतीने अशी मदत व्हावी यासाठी अशा कुटूंब प्रमुखांची नावे संबंधित शहरातील अथवा गावातील बूथ अध्यक्षांमार्फत, शक्ती केंद्र प्रमुखांमार्फत तालुका/मंडल अध्यक्षांपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.