जिल्हा वार्षिक नियोजन निधीच्या माध्यमातून पोलीस विभागाचे बळकटीकरण

0
123

4 स्कॉर्पिओ, 10 बोलेरो जीप व 10 मोटारसायकली रायगड पोलीस विभागाकडे सुपूर्द

अलिबाग (जिमाका):- जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 4 स्कॉर्पिओ, 10 बोलेरो जीप व 10 मोटारसायकली पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज पोलीस कवायत मैदान, अलिबाग येथे पोलीस विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या.

यावेळी खासदार सुनिल तटकरे, सर्वश्री आमदार भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, अनिकेत तटकरे, महेंद्र थोरवे, जि.प.अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, जिल्हा परिषद बांधकाम सभापती अजय झुंजारराव, नगराध्यक्ष  प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी  निधी चौधरी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ,पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम, तहसिलदार सचिन शेजाळ, पोलीस विभागाचे अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वप्रथम पोलीस कवायत मैदानात आगमन झाल्याबरोबर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांना पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली. त्यानंतर नव्या वाहनांचे उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे नव्या वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास तसेच, पोलीस बंदोबस्तांसाठी या वाहनांचा निश्चितच चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे. जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतून पोलीस विभागासाठी नवीन वाहने खरेदी करण्यात आली आहेत. ही वाहने पोलीस विभागाला आज सुपूर्द करण्यात आली. पोलीस विभागामार्फत या वाहनांचा योग्य उपयोग करून पोलिसांमधील कार्यक्षमता व गतिमानता वाढण्यास मोलाची मदत होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी कोविड संकटात पोलीस विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल पोलीस विभागाचे कौतुक केले. तसेच पोलीस कवायत मैदानाच्या संरक्षक भिंतीचे काम जिल्हा वार्षिक योजनेतून लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही सांगितले.

त्यांनी कोविडच्या प्रादूर्भावामुळे निधन पावलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत, या सांत्वनपर शब्दात निधन झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना यावेळी श्रध्दांजली वाहिली.