पालकमंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते करंजाडे नागरी आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन

0
162

येत्या दोन दिवसात लसीकरण केंद्र सुरू होणार

सिडकोकडून पनवेल पंचायत समिती ग्रामीण आरोग्य विभागाकडे उपकेंद्राचे हस्तांतर

पनवेल:

          करंजाडे नागरी आरोग्य उपकेंद्राचे उदघाटन आज (सोमवार दि.२४ मे) पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. करंजाडे, चिंचपाडा परिसरातील नागरी आरोग्य उपकेंद्राची इमारत यापूर्वीच बांधून तयार आहे. सिडको हे केंद्र जिल्हा परिषदेकडे हस्तांतर करणार होते. मात्र सातत्याने केलेला संघर्ष व पाठपुराव्यामुळे हे उपकेंद्र अखेर सिडकोकडून पनवेल पंचायत समिती ग्रामीण आरोग्य विभागाकडे हस्तांतर करण्यात आले. सोमवारी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते फीत कापून या उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याठिकाणी येत्या दोन दिवसात कोविड लसीकरण केंद्र सुरु होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

             सदर उदघाटनप्रसंगी तहसीलदार विजय तळेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे, गटविकास अधिकारी लता मोहिते, सिडको आरोग्य अधिकारी डॉ.बी एस बाविस्कर, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, तालुका आरोग्य अधिकारी सुनील नखाते, ग्रामसेवक, डी.यु.देवरे, प्रेमसिंग गिरासे, करंजाडे सरपंच रामेश्वर आंग्रे, पोलीस पाटील कुणाल लोंढे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत पाटील, गणेश कडू, शिवदास कांबळे, जि.प.सदस्य रवींद्र पाटील, ध्रुव बोरकर, प्रल्हाद केणी, नंदकुमार मुंडकर, गौरव गायकवाड, भरत राणे, अनिल केणी, निलीमा भगत, श्रीमती केरेकर, श्रीमती रसाळ, श्रीमती प्रभू आदी उपस्थित होते.

           करंजाडे वसाहतीचे नागरीकरण आणि विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. करंजाडेतील नागरिकांना खाजगी दवाखान्यात महागडे उपचार घेताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे सिडकोने सुरवातीलाच याठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची सोय करणे अपेक्षित होते. दरम्यान या ठिकाणी प्राथमिक उपकेंद्र सुरु करावे हि मागणी यापूर्वीचीच आहे. खाजगी रुग्णालयात सर्दी खोकला आणि साधा ताप असला तरी उपचार दिले जात नाहीत. सर्वच रुग्णाकडे कोरोनाच्या नजरेतून पाहिले जात आहे. त्यामुळे करंजाडे परिसरातील रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्याचबरोबर खाजगी रुग्णालायत उपचार घेणे अनेकांना परवडणारे नाही.

            करंजाडे परिसरातील सिडकोने बांधकाम केलेले प्राथमिक नागरी आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत होते. हे आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी विविध स्तरावरून पाठपुरावा सुरु होता. गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सिडको आरोग्य विभागाच्या समन्वयाने हे आरोग्य उपकेंद्र पनवेल पंचायत समिती आरोग्य विभागाकडे हस्तांतर करण्यात आले. त्यानुसार हे उपकेंद्र सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. आणि सोमवारी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते फीत कापून या आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

येत्या दोन दिवसात लसीकरण केंद्र सुरू होणार-

         करंजाडे नागरी आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले असून, येत्या दोन दिवसात या उपकेंद्रामध्ये कोविड लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा आणि संघर्षाला यश-

       याबाबत गेल्या दोन वर्षभरापासून करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे, पोलीस पाटील कुणाल लोंढे, रवींद्र गायकवाड, तहसीलदार विजय तळेकर, सिडको आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. बाविस्कर, गौरव गायकवाड, करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोशिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर यांचा पाठपुरावा यशस्वी ठरला आहे.

करंजाडे नोडमध्ये सिडकोमार्फत आरोग्य केंद्र इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. परंतु तेथे कोणत्याही प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली नव्हती. याठिकाणी दोन दिवसात लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू व्हावे जेणेकरून या केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आरोग्यविषयक सुविधांचा लाभ होईल.

– रामेश्वर आंग्रे (सरपंच, करंजाडे)