रेवदंडा समुद्रात बार्ज बुडाली; जे एस डब्लू कंपनीच्या मालवाहू बार्ज च्या 16 खलाशांना वाचविण्यात यश

0
330

मुंबईतून जेएसडब्ल्यू साळाव येथे माल घेऊन निघाली होती बार्ज

पाली/बेणसे : रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोर धरला आहे.अशातच जून महिन्यात सागरी मासेमारी बंद असल्याने अनेक बोटी किनाऱ्यावर लागल्या आहेत, मात्र मालवाहू बार्ज आजही समुद्रात दिसतायेत. मुंबईतून जेएसडब्ल्यू साळाव येथे माल घेऊन निघालेली बार्ज रेवदंडा खाडीमध्ये बुडाल्याची घटना घडली आहे. या बार्जमधील 16 खलाशांना वाचविण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आले आहे. बुधवारी दि.(17) रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ‘एम.व्ही. मंगलम’ ही बार्ज मुंबई येथून जेएसडब्ल्यू कंपनीचा सीएलओ हा कार्गो घेऊन जेएसडब्ल्यू साळाव येथे येत होती. परंतु रेवदंडा खाडीमध्ये कोर्लई किल्ल्याजवळ समुद्रात या बार्जमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली.
याबाबत बार्जमधील खलाशांनी कंपनीला कळविले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुरुड येथील भारतीय तटरक्षक दलाचे जवान, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, पोलीस, महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांसह जेएसडब्ल्यू कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले आणि बचावकार्याला सुरुवात झाली. या दुर्घटनेत जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे आपत्ती व्यवस्थापन टीमने महत्वपूर्ण भूमिका बजावत मदतीसाठी तात्काळ आवश्यक ती ती मदत घटनास्थळी दाखल केली.
या बार्जवर 16 खलाशी होते. यापैकी 3 खलाशांना बोटीने वाचविण्यात आले होते. तर उर्वरित 13 खलाशांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात यश आले असल्याची माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन लेपांडे यांनी दिली आहे.
बचावलेल्या खलाशांमध्ये कॅप्टन सुदाम देवनाथ, सिरा राजू, मंतव्य राज, संतोष कुमार कटरी, एसके मुस्लर रहमान, मयांक तांडेल, अमित निशाद, मोहम्मद सरफराज, पवन कुमार गुप्ता, मोहम्मद कैफ, समीर विश्वकर्मा, राकेश कुमार गुप्ता, सफात मोहम्मद, मनोज कुमार जैस्वाल, पंकज कुमार पटेल, मिजान एसके यांचा समावेश आहे.