Home पनवेल महाडकरांसाठी भाजपच्यावतीने मदतीचा हात
पनवेल : महापूर आणि दरड या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी भाजपच्यावतीने महाडकरांना मदतीचा हात देण्यात येत असून त्या अनुषंगाने मदतीचा ओघ सुरूच आहे.
गुरुवारी तळीये गावात दुर्देवी घटना घडल्याचे समजताच त्याचदिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार निरंजन घटनास्थळी रवाना झाले. प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी आला नव्हता, त्यापूर्वीच हि भाजपची नेते मंडळी मदतीसाठी धावून आली.मात्र रिस्क्यू ऑपरेशन टीमने त्यांना त्या ठिकाणी जाऊन दिले नाही. त्यामुळे तेथेच तळ ठोकत शुक्रवारी सकाळी हि मंडळी तसेच आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पदाधिकारी तळीये येथे नागरिकांच्या मदतीसाठी दाखल झाले. या सर्वानी तळीये गावाची पाहणी करताना ग्रामस्थांना धीर दिला. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तळीये गावाला रविवारी भेट देऊन ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला. तसेच केंद्राच्या मार्फत पुनर्वसन व इतर आवश्यक मदत करण्याचे त्यांना आश्वासित केले. तसेच माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनीही चिपळूण, खेड येथे पूरग्रस्तांची भेट घेत महाडलाही भेट दिली व तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना सावरण्याची हिमंत दिली.
रायगड जिल्ह्यात बुधवारपासून जणू ढगफुटीचं सुरु झाली आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले. महाडमध्ये महापूर आणि दरड कोसळून मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली. या अस्मानी संकटात सावरण्यासाठी वेळ लागणार असला तरी सध्या त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न लक्षात घेता रायगड व ठाणे जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महाडकरांसाठी मदतीचा हात दिला आहे.
गुरुवारी झालेल्या महापूर व दरड कोसळण्याच्या घटनेने महाडकरांवर मोठे संकट आले. या परिस्थितीमुळे नागरिकांना भोजनाची व्यवस्थाही नव्हती. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने अन्नधान्य जमा करून घेत हिरवळ प्रतिष्ठानच्या महाविद्यालयात भोजन व्यवस्था करण्यात आली. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ तांदूळ, डाळ आदी भोजन साहित्याची व्यवस्था या ठिकाणी करून दिली. त्या अनुषंगाने शनिवारपासून दररोज ०६ हजार महाडकर नागरिकांची भोजन व्यवस्था करण्यात आली असून बिस्किटे, व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्यावर भोजन तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली असून त्यांची टीम तसेच दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ऍड. महेश मोहिते, उपाध्यक्ष राजेश मपारा, सरचिटणीस मिलिंद पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, नाना महाले, बिपीन म्हामुणकर महाडमध्ये ठाण मांडून असून ते व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते गरजूंना भोजन, पाणी व इतर मदत पोहोचवत आहेत.