जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पालिकेला लसपुरवठा ; जिल्ह्यातील ३५ टक्के वाटा पालिकेला

0
143

पनवेल : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू असलेले लसवाटप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत आला घेतले आहे. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात मागील आठवडाभरात लसपुरवठा थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होत असल्याने लसींचा पुरवठा वाढला आहे.जिल्ह्याच्या ३५ टक्के वाटा पनवेलला देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात लसीकरणच्या चौथ्या टप्पा सुरू झाल्यानंतर लस सुरळीत येत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पनवेलमध्ये महापालिकेच्या १८ लसीकरण केंद्रातून दररोज सुमारे ३५०० पेक्षा अधिक लसीकरण करण्यात आलेले आहे. मात्र लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण होवू शकले नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या नियोजनातून सुरू असलेले लसीकरण वारंवार येणाऱ्या तक्रारींमुळे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नियोजन स्वताकडे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील आठवडाभरापासून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पदमश्री भैनाडे यांच्याकडे लसवाटपाची सुत्रे देण्यात आली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात लसीकरणाची मागणी लक्षात घेता उपलब्ध लसींपैकी ३५ टक्के लस महापालिकेला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुर्वी कधी ५०० तर कधी जास्तीत जास्त १५०० लस दिल्या जात होत्या. आता २ हजार ते ३ हजार लस एका दिवशी देण्यात आल्यामुळे पनवेल महापालिकेला पुरेसा लससाठा उपलब्ध झाला आहे.
कोविशिल्ड आणि कोव्हँक्सीन प्रकारच्या दोन्ही लस मिळून पनवेल महापालिका क्षेत्रात २ लाख १० हज़ारापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. दुसऱ्या डोससाठी ९२ हजार ३०७ कोव्हीशिल्ड आणि ११ हजार ४१२ कोव्हँक्सीनचे लाभार्थी शिल्लक आहेत.