मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थित प्रवेश
पेण : पेण तालुक्यात भाजपला अनेक धक्के बसत असून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्ह्यातील आंदोलन सम्राट म्हणून प्रसिद्ध असलेले रायगड जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विष्णूभाई पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे प्रवेश झाला आहे. काही दिवसांपूर्वी भाजप उपाध्यक्ष संजय जांभळे यांनी शिवसेनेत तर सर्वात श्रीमंत असणारे भाजपचे वडखळ सरपंच राजेश मोकल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे सध्या पेण तालुक्यात भाजपला खिंडार पडत आहे.
शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातील उत्तम संघटक म्हणून ओळख असलेले विष्णूभाई पाटील यांनी पक्षातील अंतर्गत कलहातून काही वर्षांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांना भाजपचे दक्षिण रायगडचे उपाध्यक्ष पद दिले गेले होते. मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेले विष्णूभाई पाटील हे गटतट असलेल्या भाजप मध्ये फारसे रमले नाहीत. शिवसेनेत नसताना देखील त्यांनी मागील लोकसभा निवडणुकीत देखील शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचा प्रचार केला होता. मंगळवारी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा स्वीकारला आहे.
विष्णूभाई पाटील हे तळागाळातील जनतेचे प्रतिनिधित्व करणारे कार्यकर्ते असून जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात लढा देऊन 40 गावांना पिण्याचे पाणी दिले होते. तसेच शिवसेनेच्या माध्यमातून जनतेच्या तसेच कामगारांच्या अनेक प्रश्नांवर आंदोलने करुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या शिवसेनेतील स्वगृही प्रवाशाने रायगड मधील विशेषतः पेण मतदार संघातील शिवसेनेची ताकद वाढली आहे.
या प्रवेश कार्यक्रमास उद्योग मंत्री सुभाष देसाई, जिल्हाप्रमुख तथा आमदार महेंद्र दळवी, माजी सभापती संजय जांभळे, तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे यांच्यासह पेण, पाली येथील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.