सह्याद्री विद्यार्थी अकादमीचा पुढाकार
दिघी – श्रीवर्धन तालुक्यातील सह्याद्री विद्यार्थी अकादमीने रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना राखी बांधून हा सण साजरा करण्याचे ठरविले आहे.
येथील सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र पुरस्कृत श्रीवर्धन तालुका विभागाकडून दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, बाप्पा माझा विद्येचा राजा, तसेच रद्दी महोत्सव, विशेषतः गडकिल्ल्यांच्या संवर्धन सोबत गरजूंना मदतीचे असे अनेक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले आहेत. गतवर्षी सीमेवरील जवानांना रक्षाबंधन सणाला राख्या पाठवण्याचा कार्यक्रम अकादमीने सुरू केलं आहे. यावर्षी ही सर्व सदस्यांच्या सहभागाने उत्स्फूर्तपणे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
रक्षणकर्त्या भारतीय सैनिकासाठी एक प्रेमाचा ऋणानुबंध म्हणून राखी पाठवण्यात येणार असून देशाच्या सीमेचे डोळ्यांत तेल घालून संरक्षण करणारे जवान व लष्कराप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करताना हा सण जोपासण्याचा सह्याद्री परिवाराचा हेतु असल्याचे अकादमीचे संपर्क प्रमुख प्रयोग किर यांनी सांगितले. या कार्यात सहभागी होऊन आपली राखी जवानांना पाठवायची आहे. त्यामुळे 8 ऑगस्ट पर्यंत आपली राखी अनुप्रिता विलणकर संपर्क ०८४०७९२६४६१ आणि ऐश्वर्य विलणकर ०९११२११९९७३ या सदस्यांकडे सुपूर्द करायची आहे असे आवाहन अकादमीच्या वतीने करण्यात आले आहे.
जवान भारतीय सीमेवर अहोरात्र रक्षण करत असतात, त्यांच्यासाठी देशाचे रक्षण पहिले कर्तव्य असते. त्यामुळे त्यांना घरी येऊन रक्षाबंधन वा अन्य सणही साजरे करता येत नाही. त्यामुळे भारतीय सैनिकांप्रती असलेले प्रेम व आदर व्यक्त व्हावा तसेच त्यांनाही आपली कुणीतरी काळजी करीत असल्याचा संदेश जाण्यासाठी प्रतिष्ठानने रक्षाबंधनानिमित्त राखी जमा करण्याचे अभियान हाती घेतले आहे.