पनवेल :
पनवेल शहरातील जोशी आळी येथील गोकुळ गोल्ड सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या सोन्याचे रिफाईन सेंटर मधील एका इसमाला त्याच्या ताब्यातील सोने खाली घेवून येत असताना दोन अज्ञात इसमांनी त्याच्या डोक्यात रिव्हॉल्व्हरचा दस्ता मारुन त्याच्याकडील सोन्याची बॅग काढून घेवून ते मोटार सायकलवरुन पसार झाल्याची घटना घडली आहे. सदर बॅगेमध्ये साधारणत दिड किलो सोने ज्याची अंदाजे किंमत 75 लाख एवढी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शहरातील जोशी आळी येथील गोकुळ गोल्ड सोसायटीमधील पहिल्या मजल्यावर धीरज जैन व रावसाहेब कोळेकर यांचे सोन्याचे रिफाईन सेन्टर आहे. दिपेश जैन मुंबई व्यापारी आहेत ते सदर दुकानातुन खाली येत असता भर बाजारात 2 मजबुत शरीरयष्टीचे इसम त्यांची वाट पहात टेहळणीवर होते. दिपेश जैन हे खाली येताच एक इसमाने त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविला व त्यांच्या जवळील सुमारे दिड कीलो सोन्याची असलेली बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न करू लागला. आपल्या हातात बॅग येत नसल्याची पाहुन सदर इसमाने व्यापारी दिपेश जैन यांच्या डोक्यात रिव्हॉल्व्हरचा दस्ताच डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी करून दोन्ही अनोळखी इसम मोटारसायकल घेऊन फरार झाले. सदर सोन्याची अंदाजे किंमत 75 लाख इतकी आहे. यावेळी दिपेश जैन याने तो रक्ताच्या थारोळ्यात असतानाही पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते गल्लीतून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, वपोनि अजयकुमार लांडगे, वपोनि बी.एन.कोल्हटकर, वपोनि गिरीधर गोरे, वपोनि रवींद्र दौंडकर यांच्यासह विविध पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. त्या भागातील विविध दुकानात असलेल्या सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात असून जखमी दिपेश जैन याला शहरातील पटेल रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भितीयुक्त वातावरण आहे.