महाड पूरग्रस्तांसाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मदत रवाना

0
116

पनवेल :  रायगडचे जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत एल अँड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने (एलटीपीसीटी) तातडीने महाडमधे चार वैद्यकीय युनिट्स कार्यरत करून पूरग्रस्तांना सेवा पोहोचविण्याचे काम केले जात आहे. या आपत्ती प्रतिसाद उपक्रमाला रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि पनवेलचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले यांनी हिरवा झेंडा दाखवून तात्काळ सेवा कार्यान्वित केली.
एलटीपीसीटीची चार वैद्यकीय युनिट्स २४ वैद्यकीय कर्मचारी, सर्वसाधारण तपासणी, आवश्यक औषधे आणि लेप्टोस्पारयोसिस, डेंग्यु, मलेरिया आणि कोविड- १९ च्या तपासणीसाठी आवश्यक उपकरणे व सुविधांनी सज्ज आहेत. एल अँड टी वैद्यकीय मोबाइल टीम एकंदर परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ८ ते १० दिवस अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरवणार आहे.
एल अँड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, या लार्सन अँड टुब्रो भारतातील आघाडीची ईपीसी व उच्च तंत्रज्ञान उत्पादक आणि सेवा समूहाचा भाग असलेला ट्रस्ट रायगड जिल्ह्यातील महाड पूरग्रस्त भागात मदतीसाठी पुढे आला आहे. सरकारी महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार महाडमधील १८ हजार आणि पोलादपूरमधील ७५१ कुटुंबांना पूर व पावसामुळे ओढवलेल्या संकटांचा फटका बसला असून त्यामुळे स्थानिक समाजाला आरोग्याच्या तीव्र समस्यांचा धोका संभवतो आहे.
लार्सन अँड टुब्रो तसेच एलटीपीसीटीचे अध्यक्ष ए. एम नाईक म्हणाले, ‘रायगड जिल्ह्यातील महाडपूरग्रस्त भागातील समाज तसेच या भागातील आमच्या ८०० कर्मचाऱ्यांचे आरोग्य व सुरक्षेविषयी आम्ही चिंताग्रस्त आहोत. इथे राहाणाऱ्या लोकांची मोठी जीवित तसेच मालमत्तेची हानी झाली आहे. आम्हाला आशा आहे, की वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या आमच्या प्रयत्नांमुळे या संकटातून उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांना आळा बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.