सह्याद्री शैक्षणिक व सामाजिक संस्था गोवठणे तर्फे पूरग्रस्तांना मदत

0
119

      उरण : २२-२३ जुलै ला महाड,पोलादपूर, चिपळूण सह अनेक भागात पावसाने पूराच्या रुपाने रौद्र रुप दाखवले.पूर एक दोन दिवसांत ओसरला,पण मागे कायमस्वरूपी कोकणवासियांच्या मनांवर चिखलाचा गाळ साठला. कित्येकांचे संसार,स्वप्ने या पूरात वाहून गेली. तळीये सारख्या गावालाच या रौद्ररुपाने गिळंकृत केले. पूर ओसरल्यापासून मदतकार्य वेगाने सुरू झाले.विविध संस्था, संघटना,मंडळे,शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरू झाला. यापूर्वी तातडीने मदत म्हणून उरण मधील विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यावेळी माणूसकीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या पूराला आता दोन आठवडे उलटत आल्यानंतर देखील काही भागांत कोणतीही मदत पोहचली नसल्याचे स्थानिक मित्र परिवार, रहिवाशी यांच्याकडून कळल्या नंतर याच मानवतेच्या सादाला प्रतिसाद देण्यासाठी सह्याद्री शैक्षणिक व सामाजिक संस्था गोवठणे पुढे आली. संस्थेच्या वतीने कांबळेवाडी, मोहोत,खरवली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. याप्रसंगी फक्त मदत न करता पिडीतांशी संवाद साधत त्यांना उभारीसाठी धीर दिला. संस्थेचे अध्यक्ष संतोष वर्तक सर,जेष्ठ सदस्य मच्छिंद्र वर्तक,विजया वर्तक,निर्णय पाटील,अतिश वर्तक,सागर म्हात्रे,आणि प्रितम वर्तक यांनी या कामात स्थानिक गावकरी संतोष सोनावळे आणि प्रताप सोनावणे यांच्या उपस्थितीत किटचे व कपड्याचे वाटप केले.