तळीये आपद्ग्रस्तांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी चोवीस कंटेनर हाऊस उपलब्ध होणार

0
222

महाड : तळीये दरड दुर्घटनेत आपले घर गमावलेल्या कुटुंबाना कंटेनर हाऊसच्या माध्यमातून तात्पुरता निवारा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. २४ कंटेनर हाऊसमधून २४ कुटुंबांना तात्पुरता निवारा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यापैकी आठ कंटेनर हाऊस तळीये येथे नेण्यात आले असल्याची माहिती महाडच्या प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांनी दिली.
तळीये दरड दुर्घटनेत ६३ घरांचे नुकसान झाले आहे. या गावातील कुटुंबांचे अन्यत्र कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या कायमस्वरूपी पुनर्वसनाला वेळ लागणार असल्याने कंटेनर हाऊसच्या माध्यमातून २४ कुटुंबाना हा तात्पुरता निवारा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कालच समाजमाध्यमांवरुन चोविस कंटेनर हाऊस तळीये येथे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.
आज महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्याशी संपर्क साधला असता आठ कंटेनर हाऊस तळीये येथे दाखल झाली असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित कंटेनर हाऊस आल्यानंतर त्यांचे वितरण आपद्ग्रस्ताना करण्यात येईल असेही त्या म्हणाल्या. सन २००५ मध्ये महाड तालुक्यातील दासगांव , कोंडिवते , जुई, रोहण या गावांवर दरडी कोसळून मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाली होती. अनेक कुटुंबे बेघर झाली होती. या बेघर कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी त्या गावांलगतच पत्रा शेड बांधून देण्यात आल्या होत्या. त्यातील काही गावांतील आपदग्रस्तांना कायम स्वरूपी पुनर्वसनासाठी अनेक वर्षे वाट पहावी लागली होती. तळीये आपदग्रस्तांना हा अनुभव येवू नये अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.