पनवेल परिसरातील अनेक पदपथ अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात

0
166

पनवेल : पनवेल शहरासह, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर आदी वसाहती मध्ये विविध ठिकाणी पदपथावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत, तर अनेक भागांत हे फुटपाथ दुचाकी, चारचाकी व हातगाड्यांनी, फेरीवाल्यांनी बळकावले आहेत. याकडे महापालिका व वाहतुक शाखा दुर्लक्ष करीत असल्याने पादचार्‍यांसह व्यापारी वर्गाने संताप व्यक्त केला आहे.
पनवेल परिसरातील अनेक मुख्य रस्त्यावर बँकांचे जाळे असल्याने या ठिकाणच्या फुटपाथ वर सर्रास दुचाकी व चारचाकी वाहणे पार्क केली जातात, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व बँकेत येणार्‍या जेष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पादचार्‍यांचा पायी चालण्याचा अधिकार हिसकावून घेण्यात आला आहे. तर पादचार्‍यांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यावरून जावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघातात वाढ होवून जीव जाण्याचे प्रकार या ठिकाणी घडले आहेत. तसेच रेल्वे स्थानकाबाहेरील फूटपाथ वर अनधिकृतपणे मोटरसायकल उभ्या केल्या जातात. त्यामुळे घाईने लोकल पकडणार्‍या पदाधिकार्‍यांची गैरसोय होत आहे. सकाळी आठ ते नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत या गाड्या तशाच फुटपाथ वरती उभी असतात, त्यामुळे नागरिकांना फुटपाथ ऐवजी रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. दररोज पनवेल हून अन्य ठिकाणी प्रवास करणार्‍या व नोकरदार वर्गांची संख्या अधिक असल्याने त्या तुलनेत रेल्वे स्थानकाबाहेरील वाहनतळाची क्षमता कमी असल्याचे पनवेल महापालिकेकडे वाहनतळाची उपायोजना करण्यासाठी करण्याची मागणी नागरिक करत आहेत. तर अनाधिकृतपणे फुटपाथवर पार्किंग करणार्‍या बेशिस्त वाहन चालकावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे त्यामुळे पदपथावरील अतिक्रमणे, फेरीवाले,वाहने तत्काळ हटवावीत अशी मागणी स्थानिक नागरीक व पादचारी करत आहेत.

कोरोना काळामध्ये वाहतूक विभागाकडून होणार्‍या कारवाया कमी करण्यात आल्या होत्या. परंतु निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यामुळे रहदारी वाढत आहे. अनाधिकृतपणे वाहने पार्क करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे काम सुरू आहे.
अभिजीत मोहिते
पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा पनवेल