दर्जेदार साहित्य हे आईच्या संस्कारातूनच – प्रा.एल.बी पाटील

0
353

पनवेल : आईचे संस्कार हे जीवन घडवतात, या आईच्या संस्कारातून दर्जेदार साहित्य निर्माण होते असे मत ज्येष्ठ साहित्यिक,रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील यांनी के.आर फाउंडेशन उरण आयोजित कवियत्री स्वर्गीय सुनंदा कृष्णा पाटील उर्फ सुनाई यांच्या 12 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या मधुबन कट्टाच्या काव्य संमेलनात व्यक्त केले.
ज्येष्ठ पत्रकार, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनास उरण नगरीचे माजी नगराध्यक्ष नागराज सेठ, वास्तुविशारद एकनाथ पाटील, सुप्रसिद्ध कवी अमृत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत भोईर, सुनाई यांचे सुपुत्र अ‍ॅड.डी.के. पाटील उपस्थित होते. या पुढे बोलताना प्रा.एल.बी. पाटील यांनी, लहानपणापासून आपण आईच्या संस्कारातून घडत आलो आहे. कुणाला आईचे प्रेम मिळाले तर कुणाला आईचे प्रेम मिळाले नाही. आई ही संस्काराची खाण आहे,ज्या साहित्यिकांचे लेखनामध्ये सातत्य आहे असे साहित्यिक यश मिळू शकतात असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी, प्रतिभावंत कवी समाजाला आनंद देतो तर आपल्यातील दुःख विसरायला लावतो ही कवींच्या शब्दाची ताकद नवोदित कवींना स्फूर्ती देते. ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्याला उजाला देण्याचे काम अशा कवी संमेलनातून होत आहे,ही अशीच परंपरा पुढे चालत राहो असे कोळी यांनी सांगितले. या कविसंमेलनात कवियत्री स्वर्गीय सुनंदा कृष्णा पाटील उर्फ सुनाई यांच्या साहित्याला उजाळा देण्यात आला. यावेळी वास्तुविशारद एकनाथ पाटील, चंद्रकांत भोईर, अ‍ॅड. डी.के.पाटील यांची भाषणे झाली. यावेळी आई, अघोट, स्वतंत्रता, शिकार, पुरुष, पाऊस, संस्कार, चिमणी- पाखरे, तळईगाव, सांज, देवतुल्य बाबा- आई अशा विविध विषयांवर कविता कवींनी सादर केल्या. मान्यवरांच्या हस्ते कवींना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन पत्रकार प्रदीप पाटील, कवियत्री रंजना केणी यांनी केले.