पेण तालुक्याचा समतोल विकास करण्यास प्राधान्य- पालकमंत्री आदिती तटकरे

0
207

पेण :

    पेण तालुक्यात एका बाजूला औद्योगीकरण व दुसऱ्या बाजूला डोंगर पट्ट्यात राहणारा आदिवासी बांधव अशी भौगोलिक परिस्थिती आहे. त्यामुळे पेण तालुक्याचा समतोल विकास साधण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज वडखळ व डोलवी येथे बोलताना केले. डोलवी येथील ग्रामपंचायती मार्फत भरविण्यात आलेले मोफत आरोग्य शिबिर व फिल्टरेशन प्लांटचे उद्घाटन तसेच वडखळ ग्रामपंचायतीच्या मार्फत उभारण्यात आलेल्या अभ्यास केंद्र इमारत व आधार केंद्राचे उद्घाटन आज पालक मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले.

     यावेळी वडखळ सरपंच राजेश मोकल, डोलवी सरपंच वनिता म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य प्रभाकर म्हात्रे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार डॉ.अरुणा जाधव, सामाजिक कार्यकर्ते अनिल म्हात्रे, जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे कॅप्टन रॉय, नारायण बोलबंडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दयानंद भगत, पेण पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, परशुराम म्हात्रे, उदय जवके आदी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कि, स्वच्छ पाणी मिळणे ही मूलभूत गरज आहे. मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पेण तालुक्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मागील दोन वर्षापासून आरोग्याचे महत्व कोरोनामुळे आपणा सर्वांना समजले आहे, या विरोधात लढण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र सुसज्ज ठेवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना प्रतीबंधक लस घेण्यास महिला मागे आहेत, मात्र असे न करता त्यांनी लस घेण्यासाठी प्राथमिकता द्यावी असे आवाहन अदिती तटकरे यांनी यावेळी केले. या परिसरातील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी केंद्र उभारण्याचे प्रयत्न करावे व कंपनीच्या सी.एस.आर.फंड चा विस्तार करावा असे म्हटले.

    रायगड जिल्ह्यात वडखळ नाका चे महत्व मोठे आहे. या ग्रामपंचायतीने भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र तसेच नागरिकांसाठी उभारण्यात आलेले आधार केंद्र महत्त्वाचे आहेत. या अभ्यास केंद्रातून विद्यार्थ्यांबरोबरच महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी देखील अभ्यासक्रम आयोजित करावेत, अशी अपेक्षा आदिती तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली. या अभ्यास केंद्रात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर देखील आयोजित करावे व दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांना एकत्रित अभ्यास करण्यासाठी व्यवस्था करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केली. विद्यार्थ्यांचा ज्ञानात अधिक भर पडावी यासाठी लायब्ररी असावी त्यासाठी खासदार सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान मार्फत देखील मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.