एक लाखाच्या लाचेप्रकरणी पनवेल येथील दोन वनरक्षक गजाआड

0
312

नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पनवेल
एक लाख रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पनवेल येथील दोन वन रक्षकांवर कारवाई केल्याने वन खात्यामध्ये घबराटीचे वातावरण आहे.
तक्रारदार याचे वडील व काका यांनी तालुक्यातील करंबेळी मोर्बे येथील दळी भाग जमिनीतून 29 गुंठे जागा वन विभाग महाराष्ट्र शासकीय योजनेनुसार शनिवार महादू सपरा यांचेकडून कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र करून घेतले. तक्रारदार यांनी करंबेळी गावातील दळी जमीन ही बाळू गडगे व पवन चौधरी यांना विकून दलाली केली. त्या जमिनीवर तारेचे कुंपण घालण्याकरिता तसेच जमिनीवरील असलेली झाडे तोडताना कोणतीही कारवाई न करण्याकरिता तीन व्यवहार खरेदीदारांकडून प्रत्येकी 40 हजार रुपये प्रमाणे असे एकूण 1 लाख 20 हजार रुपयाची मागणी केली. तडजोडी अंती एक लाख रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्या संदर्भातील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई येथे केल्यानंतर पर्यवेक्षण अधिकारी श्रीमती.ज्योती देशमुख यांच्या पथकाने पनवेल परिसरात सापळा रचून लाच स्वीकारणारे ज्ञानेश्‍वर गायकवाड (36 पद वनरक्षक पनवेल रेंज) व माधुरी पाटील (26 वन रक्षक संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन पनवेल) यांना ताब्यात घेवून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन खैरनार करीत आहेत.