जसखारचे श्री रत्नेश्वरी मंदिर वाचविण्यासाठी युवा सामाजिक संस्था जसखार व ग्रामस्थांचा पुढाकार

0
235

केेंद्रिय राज्यमंत्री कपिल पाटील व युवा नेते अमित ठाकरे यांना निवेदन

उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील जसखार गावातील श्री रत्नेश्वरी देवीच्या मंदिरामागून जाणाऱ्या उड्डाण पुलामुळे
मंदिराला होणाऱ्या नुकसानी संदर्भात केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील आणि युवा सामाजिक संस्था जसखार यांच्या सोबत खासदार कपिल पाटील यांच्या भिवंडी येथील निवासस्थानी सकारात्मक चर्चा झाली. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी युवा सामाजिक संस्था जसखार या सामाजिक संस्थेला पाठिंबा देऊन मंदिरासाठी सर्वोत्तोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
या चर्चेदरम्यानच जेएनपीटीचे चेअरमन संजय सेठी यांना कपिल पाटील यांनी दूरध्वनीद्वारे त्यांच्याशी चर्चा करून त्यांना देवीच्या मंदिरा संदर्भात लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी आदेश दिले.तसेच श्री रत्नेश्वरी देवीच्या मंदिरामागून जाणाऱ्या ब्रिजच्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या सोबत युवा सामाजिक संस्था जसखार यांची बैठक झाली. तसेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि अविनाश जाधव, सचिन गोले यांच्या सोबत सुद्धा चर्चा झाली. चर्चेअंती मनसेचे शिष्टमंडळ लवकरच मंदिरामागून जाणाऱ्या ब्रिजच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी जेएनपीटीमध्ये येण्याचे आश्वासन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
मनसेचे युवा नेते अमित ठाकरे व इतर मनसेचे नेते तसेच खासदार कपिल पाटील यांच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करत युवा सामाजिक संस्था जसखार आणि संपूर्ण जसखार ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहे. जेएनपीटी बंदर येथे नवीन कार्यरत झालेल्या सिंगापूर टर्मिनल्स कंपनीचे काम चालू आहे.परिणामी या कंपनीच्या कंटेनर ट्रेलरच्या वाहतुकीसाठी नियोजित रस्ता जसखार गावच्या चारही बाजूने होत आहे. परिणामी या महामार्गावरील उड्डाणपुलामुळे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री रत्नेश्वरी देवी मंदीराला याचा फटका बसला आहे.
त्यामुळे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या हिंदू पारंपरिक उपासना स्थळाचा, सांस्कृतिक व धार्मिकतेचा भविष्यात नाश होईल व मंदिर लयास जाण्याची भीती जसखार गावातील तमाम गावकऱ्यांना आणि तालुक्यातील तमाम जनतेस वाटू लागले आहे. कारण की देवीच्या मंदिरा जवळून जाणारा उड्डाणपुलाचे काम चालू असतानाच देवीच्या मंदिराला तडे गेले आहेत त्यामुळे भविष्यात या रस्त्याच्या उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यावर या मंदिराच्या वास्तूची प्रचंड प्रमाणात हानी होणार आहे.त्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला आहे. भविष्यात येथे रस्त्यावर उड्डाणपुलावरून मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक होणार असून परिणामी या अवजड वाहनांमुळे मंदिराला मोठ – मोठे हादरे बसण्याची शक्यता आहे.
याशिवाय या मार्गावरून आयात निर्यातीत हझारडस धोकादायक कंटेनरची वाहतूक होणार असल्यामुळे जसखार गावातील लोकांच्या जीवाला व मालमत्तेला मोठा धोका निर्माण झाला आहे. जसखार गावच्या रहिवासी जनतेच्या आरोग्याला या उड्डाणपुलामुळे बऱ्याच गोष्टी अपायकारक ठरणार आहेत.तसेच लहान मुले, स्त्रिया, वयोवृद्ध यांना भविष्यात मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे.सिंगापूर टर्मिनल्सच्या दळणवळणासाठी लागणाऱ्या या रस्त्याच्या जसखार गावच्या लगत जाणाऱ्या भरावामुळे जसखार गावातील सांडपाणी व पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत नाही परिणामी जसखार गाव भविष्यात पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तीन वर्षे सलग गावात पूरस्थिती निर्माण होत आहे.
त्यामुळे जसखार गावच्या श्री रत्नेश्वरी मंदिर च्या बाजूने जाणाऱ्या या उड्डाणपुलाला गावातील जनता व युवा सामाजिक संस्था जसखार या सामाजिक संस्थेचा तीव्र विरोध आहे. उड्डाण पुलाच्या कामामुळे मंदिराला तडे गेलेले आहेत.त्यामुळे प्रत्यक्ष कामाची पाहणी करून मंदिराची प्रत्यक्ष अवस्था पाहून सदर उड्डाणपुलाचे काम थांबवावे.भविष्यात होणारा धोका लक्षात घेता सदर उड्डाणपुलाच्या मार्गामध्ये बदल करावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून युवा सामाजिक संस्था जसखार व ग्रामस्थांच्या वतीने खासदार कपिल पाटील व मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
श्री रत्नेश्वरी मंदिराचे संरक्षण,संवर्धन करण्यासाठी युवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून युवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हर्षल ठाकूर, उपाध्यक्ष गर्दीश म्हात्रे,सेक्रेटरी संदीप भोईर, खजिनदार-मयूर तांडेल,सल्लागार रंजित पाटील , कायदेविषयक सल्लागार ऍडव्होकेट रत्नदीप पाटील, ऍडव्होकेट किशोर पाटील,ऍडव्होकेट मीनाक्षी पाटील, संस्थेचे सदस्य नितीन पाटील, निशांत ठाकूर, सचिन घरत, मेघनाथ ठाकूर, परेश घरत आदी संस्थेचे पदाधिकारी-सदस्य व ग्रामस्थ हे श्री रत्नेश्वरी मंदिर वाचण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.