पनवेल : शहरातील मुख्य ठिकाणी असलेल्या व नुकतेच सुशोभिकरण केलेल्या वडाळे तलावाला वंदनीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यात बबन पाटील यांनी म्हटले आहे की, पनवेल तालुक्याला अनेक महान व्यक्तीमत्वांची वारसा लाभलेला आहे. त्यात वंदनीय दि. बा. पाटील हे या तीनही तालुक्यातील समस्त नागरिकांचे आधारस्तंभ म्हणून जाणले जातात. दि. बा. पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी केलेल्या अतुलनीय कार्यामुळेच आज हा परिसर बहरलेला आहे. त्यासाठीच आम्ही वंदनीय दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून आपल्याकडे विनंती करत आहोत कि, या महान व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यासाठी नव्यानेच सुशोभित करण्यात आलेल्या पनवेलमधील वडाळे तलावाला वंदनीय दि. बा. पाटील यांचे नाव देऊन साहेबांचा पुर्णाकृती पुतळा या परिसरात उभारल जावा.