पालीकर जनतेला दिलेल्या प्रत्येक वचनाची पूर्तता करण्यास आम्ही कटिबद्ध: खा. सुनिल तटकरे

0
169

पाली/बेणसे:

महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीतील ही पहिलीच नगरपंचायत निवडणूक असल्याने ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेकाप यांनी आघाडी करून निवडणूक लढविली. या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने आपला करिष्मा दाखवत सर्वाधिक सहा जागांवर पक्षाचे अधिकृत चिन्हावर उमेदवार निवडून आणले. निवडणुकीत जाहीरनाम्याद्वारे पालीकर जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाची पूर्तता करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. पाली नगरपंचायत पुढील पाच वर्षात विकासाचे रोल मॉडेल म्हणून नावलौकीकास आणणार असल्याची ग्वाही खा.सुनिल तटकरे यांनी शनिवार दि.(22)रोजी दिली. पाली नगरपंचायत निवडणुकीतील घवघवीत यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार सुनिल तटकरे यांनी पालीतील नवनिर्वाचित सहा नगरसेवक तसेच या निवडणुकीत रात्रंदिवस कष्ट घेणाऱ्या  पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार केला. यावेळी तटकरे बोलत होते.  नगरपंचायतीच्या माध्यमातून विकासाची नवनवीन दालने खुली झाली आहेत. अष्टविनायक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असलेल्या सुधागड पालीत महिनाभरात भरीव निधी उपलब्द करून देत विकासाला चालना दिली जाईल, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्द करून पालीच्या विकासाला झुकते माप देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल, पाली नगरपंचायत  पाच वर्षे उशिरा नगरपंचायत म्हणून अस्तित्वात आली असली तरी तो पाच वर्षांचा व आता नव्याने सर्व विकासकामांचा बॅकलॉग भरून काढू, असे तटकरे म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार एकत्रित व  भक्कमपणे काम करीत आहे, रायगड जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीने एकत्रित काम व्हावे अशी माझी व पालकमंत्री आदिती तटकरे यांची प्रामाणिक इच्छा आहे. शिवसेनेने पालीच्या विकासात सहकार्य केल्यास स्वागतच आहे.