प्रभू रामचंद्रांचे चारित्र्य आणि श्रीकृष्णाच्या राजनीतीचा संगम म्हणजे शिवचरित्र – पांडुरंग बलकवडे

0
332

कर्जत : जिजाऊंच्या संस्कारामुळे शिवराय घडले. पहिल्यांदा ते स्वतः आदर्शमय जीवन जगले. त्यांचा गनिमी कावा, त्यांची अगदी कमी मावळयांसोबत बलाढ्य शत्रूंचा पराभव करण्याची युद्धनीती, प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारातील त्यांचा बाणेदारपणा त्याचा झालेला परिणाम हे सारे आपल्याला माहीत आहे. प्रभू रामचंद्रांचे चारित्र्य आणि श्रीकृष्णाच्या राजनीतीचा संगम म्हणजे शिवचरित्र’ असे महत्वपूर्ण प्रतिपादन भारत संशोधन इतिहास मंडळाचे चिटणीस पांडुरंग बलकवडे यांनी येथे केले.
कर्जत शहरातील रॉयल गार्डनच्या सभागृहात राहुल वैद्य लिखित श्री शिवकाव्य या काव्य संग्रहाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन केले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उदघाटन केले. याप्रसंगी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, पनवेल महापालिकेचे गटनेते परेश ठाकूर, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, मुंबई विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाच्या प्राध्यापिका प्राची मोघे, इतिहास अभ्यासक सागर सुर्वे, जितेंद्र ओसवाल, भाई गायकर, मोहन ओसवाल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
बलकवडे पुढे म्हणाले, ज्याने आपल्या पित्याला आयुष्यभर तुरुंगात ठेवले, आपल्या भावांना मारले, आपल्या थोरल्या भावजईवर बलात्कार केला व तिला जनानखन्यात ठेवले. आपल्या मुलाला विषप्रयोगाने मारले. आता आमच्याकडे काय विचार सुरू आहे? त्या औरंगजेबाच्या खुलदाबाद मधील थडग्याच्या दर्शनासाठी जातायत. त्याला सुफी संत ठरवण्याचा प्रयत्न करतात. पण मी त्यांना सांगतो. औरंगजेब हा जगातील कोणत्याही मानवी समाजासाठी आदर्श ठरू शकत नाही. जर याला आदर्श ठरविण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आदर्श ठरू शकणार नाहीत, तुमचा समाज, तुमचा धर्म, तुमची संस्कृती आदर्श ठरू शकत नाही.’ असे स्पष्ट करून ‘आज प्रकाशित केले ते श्रीशिवकाव्य सर्वसामान्यांना नक्की मार्गदर्शक ठरेल. ते नक्की जगप्रसिद्ध होईल.’ असा विश्वास व्यक्त केला.
सुरुवातीला राहुल वैद्य आणि रीना वैद्य यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनतर ‘श्री शिवकाव्य’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रस्ताविकात वैद्य यांनी श्री शिवकाव्य करण्याची प्रेरणा कशी मिळाली? हे सांगितले. परेश ठाकूर यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा समृद्ध केली.’ असे सांगितले. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतात, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आपली भूमी पुनीत झाली आहे. शिवाजी महाराज जे जीवन जगले त्या संपूर्ण जीवनामध्ये एक एका प्रसंगांमध्ये पुढच्या पिढ्यांपिढ्यांना एक नवा आदर्श घालून दिला. आज लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण सारे जण वावरतो. त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये अनेक वेळा अनेक गोष्टींचा बाबतीत ज्यांच्या हातात सतट सूत्र असतात ते समोरच्याला जुमानत नाहीत. ही प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते. सत्तेच्या मस्ती मध्ये तो इतका मग्रूर होऊन जातो. त्याचा आणि सर्वसामान्यांच्या नातेसंबंध कनेक्ट तुटतो. त्यातून त्याची अधोगतिकडे वाटचाल सुरू होते. हे लोकशाहीत घडते महाराजांनी पारतंत्र्यातील मराठी मुलखाला आम्ही स्वतंत्र राज्य बनवू शकतो याची प्रेरणा दिली आणि अनेक लढायांमध्ये स्वतः पुढाकार घेऊन अनेक लढाया जिंकल्या व त्यातून जे स्वराज्य निर्माण केले. त्या स्वराज्यामध्ये निर्णयाचे अधिकार, राज्य चालवण्याचे अधिकार म्हणून ज्या व्यवस्था निर्माण केल्या त्या आजच्या लोकशाहीलाही लाजवतील आशा पद्धतीच्या होत्या म्हणून शिवरायांचे वेगळेपण देशात नव्हे तर जगात आहे.’ असे स्पष्ट केले. सूत्रसंचालन समीर खरे यांनी केले. केदार आठवले यांनी सादर केलेल्या पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.
याप्रसंगी मकरंद पाध्ये, दीपक बेहेरे, मंदार मेहेंदळे, अविनाश कोळी,पराग बोरसे, अनुपमा कुळकर्णी, अभिषेक सुर्वे, रणजीत जैन, सचिन ओसवाल, मुकेश सुर्वे, राजीव मुळेकर, डॉ. आशुतोष कुळकर्णी, गणेश वैद्य, प्रकाश पटवर्धन, योगिता राणे, अक्षया चितळे, स्मिता जोशी, अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप, निलेश चौडिये, संतोष दगडे आदी उपस्थित होते.