‘देवदूत’ कल्पेश ठाकुरचा आदर्श घेऊन तरुणांनी सामाजिक कार्यासाठी पुढे यावे – पोलीस अधीक्षक अशोक दुधे

0
346

        पेण : स्वतःचा व्यवसाय सांभाळून मागील सतरा वर्षे मुंबई – गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त प्रवाशांसाठी विनामूल्य सेवा देणारे कल्पेश ठाकूर सारख्या ध्येयवेड्या तरुणांमुळे समाजाचं भलं होऊन इतिहास रचला जातो असे गौरवोद्गार रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी पेण येथे पोलीस मदत केंद्र व सीसीटीव्ही उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केले. दादर सागरी पोलिसांनी मुंबई – गोवा महामार्गावरील आंबिवली येथे उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचे तसेच या महामार्गावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेचे उदघाटन रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उप विभागीय अधिकारी श्रीमती विभा चव्हाण, पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्र पोळ, वडखळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळा कुंभार, दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील, उद्योजक यशवंत घासे, कोपर सरपंच नवनाथ म्हात्रे यांच्या सह पोलीस कर्मचारी, ग्रामसुरकक्षा रक्षक आदी उपस्थित होते. यावेळी रायगड पोलिसांतर्फे महामार्गावरील अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या पेण येथील कल्पेश ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना पोलीस अधीक्षक अशोक दुधे म्हणाले कि, मागील सतरा वर्षे या महामार्गावरील अपघातग्रस्तांना स्वतः तन, मन व धनाने विनामूल्य सेवा देणाऱ्या कल्पेशला देण्यात आलेली “देवदूत” ही उपमा योग्यच आहे. आज समाजाला अशा ध्येय वेड्या तरुणांची गरज असून कल्पेश सारखे आणखी दानशूर सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत. एक जीव जरी वाचला तरी आपण आयुष्यात खूप काही मिळवले असे समजले पाहिजे. सर्वांच्या सहकार्याने पोलिसांचे काम होत असते; समाजाचा सहभाग वाढेल तेवढे काम सोपे होते, असे दुधे यांनी यावेळी म्हटले. गुन्हे रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात सीसीटीव्हीचे जाळे उभारणार असल्याचे दुधे यांनी सांगितले. पोलीस प्रशासन हे काम करतच आहे, मात्र या साठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन देखील त्यांनी केले. आज पोलिसांची नकारात्मक प्रतिमा रंगवली जात आहे. मात्र अनेक आव्हानांचा सामना आमचा पोलीस कर्मचारी करत असतो. मुंबई मध्ये फक्त दोन तास ट्राफिक सिग्नलला उभे राहून दाखवा असे सांगताना आमचा कर्मचारी ऊन, वारा, पाऊस ,धूळ, प्रदूषण यांचा सामना करत बारा बारा तास उभा असतो. गावांत उभारण्यात आलेल्या ग्रामसुरकक्षा दलाची स्थापना करण्यात आलेली आहे या ग्रामसुरकक्षा दलात तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन अधीक्षक अशोक दुधे यांनी यावेळी केले. कल्पेश ठाकूर पोलीस प्रशासनाच्या पुढे जाऊन काम काम करत असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी यावेळी म्हटले.