कोलाड नाक्याला आले तलावाचे स्वरूप!

0
242

नागरिकांना त्रास होत असल्याने हायवे प्रशासनाबद्दल प्रचंड नाराजी

रोहा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण कामाची पुरती दशा उडलेली दिसत असून प्रमुख रहदारीचे ठिकाण असलेल्या कोलाड नाक्यावर या महामार्गाला तलावाचे स्वरुप आले आहे. परिणामी प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने हायवे प्रशासना विरुद्ध संताप व्यक्त होत आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरण कामाचे घोंगडे अद्याप भिजतच पडले असल्याने या दिरंगाईच्या कामाचा फटका प्रवासीवर्ग, वाहनचालक व स्थानिक रहिवासी वर्गाला नाहकरित्या सोसावा लागत आहे. कोलाड नाक्यावर महामार्गावरील ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यांमुळे नाक्याला बकालावस्था आली असल्याने नाक्याचे खरे रूपच पालटले आहे. पावसाचे पाण्याचे योग्य पद्धतीने निचरा होण्यासाठीचे करण्यात आलेल्या नियोजनाचे अभावामुळे सतत पडणारे पावसाचे पाणी येथे साठून राहत असल्याने या नाक्यावर अक्षरशः तळेच तुंबले आहे. तुंबलेले तळे हे नाक्याच्या मध्यभागी असल्याने याचा त्रास नाहकरित्या सर्वांना सोसावा लागत आहे. तर येथेच दोन्ही बाजूला बसचा थांबा असल्याने येणा-या जाणा-या वाहणांचे टायरमधून चिखलमिश्रीत पाणी उडत असल्याने प्रवासीवर्गाचा जलाभिषेकही होत आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून येथे ही समस्या निर्माण झाली असल्याची माहिती असून देखील हायवे प्रशासन डोळेझाक करीत आहे. गणेशोत्सव सण तोंडावर आला असताना येथील समस्या मात्र जैसी थेच असल्याने सुस्त प्रशासनाबद्दल सर्वच स्तरातून प्रचंड नाराजीचा व्यक्त होत आहे.