लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाकरिता पाच कोटींची देणगी

0
1976

सातारा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वप्नपूर्तीच्या रूपाने स्थापन झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौंसिलचे सदस्य थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाच कोटी रुपयांची देणगी दिली. सदरचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे सातारा येथे झालेल्या सोहळ्यात सुपूर्द केला. यावेळी सर्व उपस्थितांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
रयत शिक्षण संस्थेत खासदार शरद पवार यांचा सुवर्णमहोत्सवी सक्रिय कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या ८२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेने विशेष अभीष्टचिंतन व कृतज्ञता सोहळा समारंभ आयोजित केला होता. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, तर संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार दिलीप वळसे-पाटील, सिम्बॉयसिसचे शं. बा. मुजुमदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी शिक्षणाचे दालन उभे केले. आपली ही संस्था देशातील महत्त्वाची संस्था असून ती नव्या वळणावर आहे. या पुढच्या काळात संस्थेने भविष्याचा वेध घेऊन नाविन्यपूर्ण व अद्ययावत शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी यावेळी केले.
या समारंभात डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते खासदार शरद पवार यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन प्रा. डॉ. सविता मेनकुदळे यांनी, मानपत्राचे वाचन प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संस्थेचे सहसचिव राजेंद्र साळुंखे यांनी मानले. गेल्या पन्नास वर्षांमध्ये संस्थेच्या व्यासपीठावरून खासदार शरद पवार यांनी विचार व्यक्त केलेल्या भाषणांचे संकलन केलेल्या ‘रयतच्या विचारमंचावरून’ या ग्रंथाचे तसेच विविध कार्यक्रमांमधील छायाचित्रांचे संकलन करून सुवर्णबिंदू या कॉफी टेबल बुकचे व शरदोत्सव या दृकश्राव्य डॉक्युमेंटरीचे प्रकाशन करण्यात आले तसेच रयतवाणी कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले.