Home कोकण पनवेल महानगरपालिका नोकर भरतीमध्ये सिडको प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्याची शिवसेनेची...
पनवेल : पनवेल महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती सुरु आहे. या भरतीत सिडको प्रकल्पग्रस्त गावातील व स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाने केली आहे. सिडकोने येथील शेतकऱ्यांची जमीन संपादित करून त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले आहे. या जमिनी संपादित करताना येथील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले जातील असे ठोस आश्वासन दिले होते. पण सिडकोने प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनाची कोणत्याही प्रकारची पुर्तता केलेली नाही. सिडको हद्दीतील सर्व गावे पनवेल महानगरपालिकेत सामाविष्ट केली आहेत. प्रकल्पग्रस्तांची शेती सिडकोने हिसकाऊन घेवून प्रकल्पग्रस्त नागरीकांना सिडकोने वा-यावर सोडलेले आहे. सिडकोची विकासगंगा नोकरीची हमी आमच्या डोळयांनी आम्ही कधीही बघितलेली नाही. सिडकोने प्रकल्पग्रस्तांवर अन्यायच केला आहे. मात्र तो अन्याय काही प्रमाणात कमी करताना पनवेल महानगरपालिकेमध्ये निघालेल्या नोकर भरतीमध्ये सिडको प्रकल्पग्रस्त नागरीकांना व स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्यावे व कोविड- १९ मुळे गेलेली २ वर्षाची वयाची अट वाढवून देण्यात यावी. तसेच पनवेल महानगरपालिकेचे नांव स्थानिकांना रोजगार देते म्हणून राज्यात नाव लौकीक करावे अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी माजी नगरसेवक विश्वास म्हात्रे, राजेश मोहिते उपस्थित होते.
पालिकेत प्रकल्पग्रस्त व स्थानिकांचीच नोकर भरती व्हावी म्हणून सर्व पक्षांनी एकत्र येवून प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त व स्थानिकांची नोकर भरती होवून त्यांना न्याय मिळेल.