उरण तहसिल कार्यालयात सामान्यांच्या कामात रखडपट्टी

0
27

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी सर्वच अधिकाऱ्यांसह कर्मचारी व्यस्त असल्याने नागरिकांत संताप

उरण :(विठ्ठल ममताबादे)

देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल मागील १६ मार्च २०२४ पासून वाजले असून त्यामुळे उरण तहसिल कार्यालयात विविध प्रकारचे दाखले,रेशनकार्ड व अन्य महसूल संबंधित कामासाठी येणाऱ्या तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक,वयोवृद्ध महिलांसह शालेय विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांची रखडपट्टी होत असल्याने कामाविना परत जावे लागत असल्याने याआधी रखडपट्टीत राहिलेली कामे सध्या ठप्प झाल्याचे चित्र उरण तहसिल कार्यालयात दिसत आहे.
केवळ शिपाई पदावर कार्यरत असलेले एक – दोन कर्मचारी येथे दिसत आहेत. सर्व अधिकारी व कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जासई येथील स्वर्गीय दि.बा.पाटील सभागृह येथे रवाना करण्यात आल्याचे उत्तर देऊन लोकसभा मतदानानंतर दोन महिन्यांनी तुमच्या कामासाठी या असे सांगत असल्याने सर्वांची कामे रखडली असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
उरणचे तहसिलदार डॉ.उद्धव कदम यांनी लक्ष घालून लोकसभा निवडणूक काळात लोकसभा निवडणुकीच्या कामाबरोबर उरण तालुक्यातील जनसामान्य नागरिकांची महसूल संबंधित कामे सुरळीत पार पाडण्यासाठी किमान एका निवासी नायब तहसिलदारांना व त्यांच्या समवेत लागणारे दोन – चार कर्मचारी यांना उरण तहसिल कार्यालयातील कर्तव्यावर सज्ज ठेवण्यात यावेत जेणेकरून गरजू ज्येष्ठ नागरिक,वयोवृद्ध महिला,शालेय विद्यार्थी आदी नागरिकांची तहसिल कार्यालयातील कामाविना रखडपट्टी होणार नाही.याची दक्षता घ्यावी अशी मागणी कोप्रोली येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर शिमग्या म्हात्रे यांनी केली आहे.

सध्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे आमचे बहुतांशी अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत.मात्र तालुक्यातील नागरिकांची कामे निवडणूक काळात थांबू नयेत यासाठी लागणारे अधिकारी व कर्मचारी दोन दिवसात सज्ज ठेवण्यात येतील
– डॉ.उद्धव कदम
तहसिलदार, उरण