उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना ओपन चॅलेंज

0
11

फडणवीसांच्या जाण्यायेण्याचा, हॉटेलचा खर्च मी करतो त्यांनी मणिपूरला जाऊन यावं

नवी दिल्ली : राहुल गांधी सावरकर चित्रपट पाहणार असतील तरी मी माझ्या पैशानं थिएटर बुक करेन, असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंनी समाचार घेतला. फडणवीसांच्या जाण्यायेण्याचा, हॉटेलचा खर्च मी करतो. त्यांनी एकदा मणिपूरला जाऊन यावं. तिथली परिस्थिती पाहावी. अरुणाचल प्रदेशला जाऊन यावं. काश्मिरी पंडितांची भेट घ्यावी, असा टोला ठाकरेंनी लगावला. एखादा चित्रपट निर्माता बघून मणिपूर फाईल्स काढा, असा चिमटाही त्यांनी काढला. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत उपस्थित होते.
केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ आज दिल्लीत इंडिया आघाडीची भव्य सभा होत आहे. यात इंडिया आघाडीतील पक्षांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या सभेवर भाजपनं ठगो का मेला अशी टीका केली आहे. या टिकेला ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. निवडणूक रोख्यांमुळे सरकारचं पितळ उघडं पडलं आहे. केंद्रीय यंत्रणांनी आधी धाडी टाकल्या. मग सत्ताधारी पक्षाला रोखे मिळाले. रोखे मिळाल्यानंतर संबंधित कंपन्यांना कंत्राटं मिळाली. यामुळे भाजपचा बुरखा फाटला आहे, असा हल्ला ठाकरेंनी चढवला.
परिवारवाद, घराणेशाहीवरुन टीका करणाऱ्या भाजपवर ठाकरेंनी थेट हल्ला चढवला. नुसतं माझं कुटुंब, माझा परिवार म्हणून काही होत नाही. त्या परिवाराची जबाबदारीही घ्यावी लागते. करोना संकटकाळात मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी माझं कुटुंब, माझी जबाबदारी अशी मोहीम आम्ही घेतली होती. कुटुंबप्रमुख म्हणून मी राज्याची जबाबदारी घेतली. तुमच्या कुटुंबात कोण आहे? तुम्ही आणि तुमची खुर्चीच आहात, असा टोला ठाकरेंनी लगावला.