आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

0
98

अलिबागच्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस; सात लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

अलिबाग : अलिबागमध्ये झालेल्या घरफोडीचा गुन्हा रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उघडकीस आणला. घरफोडी करणार्‍या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून त्यांच्याकडून सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

अलिबागमध्ये काही दिवसांपूर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा अलिबाग पोलिसांकडून प्रलंबित होता. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास हाती घेतला. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस हवालदार प्रतिक सावंत, जितेंद्र चव्हाण, बाबासो पिंगळे, रुपेश पिंगळे, पोलीस शिपाई अक्षय सावंत, सचिन वावेकर, भरत तांदळे, लालासाहेब वाघमोडे, अक्षय जगताप तसेच सायबर सेलचे पोलीस नाईक तुषार, पोलीस शिपाई अक्षय पाटील यांचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकामामार्फत तपासाला सुरुवात करण्यात आली. वेगवेगळ्या खबर्‍यांमार्फत माहिती घेण्याचे काम पथकाने सुरु केले. अखेर सायबर सेलच्या मदतीने संशयित आरोपीला मध्य प्रदेशातील धारमधून उचलण्यात आले. पोलिसी दणका मिळाल्यावर त्याने घरफोडी केल्याचे कबूल केले. मडिया रायसिंग मकवाना असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.